सर्वंकष विद्यामंदिरात तज्ज्ञांची मांदियाळी; शिक्षणातील नव्या संधींचा वेध

शैक्षणिक परिषदेत तज्ज्ञांनी मांडले महत्त्वपूर्ण विचार

रत्नागिरी : शिक्षण प्रणालीतील बदल, सध्याच्या प्रणालीची स्थिती आणि भविष्यातील संधी यावर सखोल विचारमंथन करण्यासाठी सर्वंकष विद्यामंदिर, रत्नागिरी येथे शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेला शहरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राचार्य, शिक्षक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यात प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सुशील शिवलकर – प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांची उपस्थिती लाभली तसेच डॉ. संतोष बेडेकर-अध्यक्ष लायन्स क्लब, सतीश कामत, सुकांत चक्रदेव, उदय लोध, सुहास विध्वंस, डॉ. अमोल पटवर्धन, डॉ .शुभांगी बेडेकर, अनघा मगदूम, भक्ती किरपेकर, संतोष तावडे, दीप्ती कानविंदे, नितीन कानविंदे, ओंकार हजारे, गौरांग आगाशे, डॉ. स्वप्ना करे, अक्षय जोशी, माधुरी साळवी, मनीष पवार, श्वेता पवार, मुक्ता भिडे, अंकिता पाटकर, गणेश खवळे, सय्यद उसामा बिजापुरी, अमेय वीरकर, अमित कदम, वैभव सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्वंकष विद्यामंदिरचे सर्वेसर्वा आणि रत्नागिरीतील प्रथितयश व्यावसायिक श्री. दीपक गद्रे आणि मीना गद्रे यांचीही उपस्थिती लाभली.

सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून परिषदेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल यांनी शैक्षणिक परिषद आयोजित कारण्यामागील प्रयोजन, बदलते युग, त्याची करणे आणि येणाऱ्या संधी हे विषय मांडून विचारमंचापुढे चर्चेला ठेवले.

चर्चेच्या प्रारंभी मा. सुशील शिवलकर – प्राचार्य जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांनी, ‘आजी आजोबा मुलांसाठी मुक्त विद्यापीठ’ असे म्हणून विषयाला सुरुवात केली. विचार आणि कृती दोन्ही बाबींची सांगड घालून आपली प्रगती करणारा विद्यार्थी असावा असे प्रतिपादन केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षण हे केवळ परीक्षांच्या कक्षेत मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारे आणि त्यांना आधुनिक जगाच्या गरजांसाठी सक्षम बनवणारे असावे.” त्यानंतर डॉ. बेडेकर यांनी आपले विचार मांडले, “विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात असला तरी तो समर्पण, निष्ठा, निर्धार, परिश्रम या मूल्यांचा अंगीकार करणारा असावा” असे म्हटले.

यानंतर उपस्थित विविध मान्यवरांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीतील सुधारणा, कौशल्याधारित शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि अध्यापन पद्धतीतील नवकल्पना यावर आपले विचार मांडले. भविष्यातील करिअर संधी, उद्योजकता तसेच विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक धोरण आणि मार्गदर्शक तत्वे यावरही विचारविनिमय झाला. सध्याच्या जलदगतीने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता व्यावसायिक आणि उद्योगप्रधान कौशल्यांवर भर देणारे असावे, यावर तज्ज्ञांचे एकमत झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, ग्रीन टेक्नॉलॉजी, स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

तसेच सर्वंकष विद्यामंदिर सारख्या प्रशालेने शाळेत खेळ आणि त्यातील करियर यावर लक्ष केंद्रित करून त्यावर काम करावे असे सुचवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी व्यक्त होण्यासाठी पाठांतरावर अवलंबून न राहता मोकळेपणे, आत्मविश्वासाने बोलावं, विद्यार्थी हा देशाचा उत्तम नागरिक बनावा, वेळेचे पुस्तकी ज्ञानाबरोबर त्यांचा भावनिक विकास व्हावा, स्थानिक संस्कृती आणि मातृभाषा, संस्कृत यांनाही शाळा, विद्यार्थी आणि पालक यांनी महत्व द्यावे असे विविध विषय उपस्थित मान्यवरांकडून मांडण्यात आले. तसेच शाळा राबवत असलेले उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत असेही मान्यवरांकडून सांगण्यात आले. या शैक्षणिक परिषदेत ऑनलाईन माध्यमातून शहरातील पालक, विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले आणि या चर्चेतून मिळालेल्या महत्त्वपूर्ण सूचनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने शाळा नक्कीच मार्गक्रमण करेल असा विश्वास व्यक्त केला. या परिषदेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. परिषदेचे सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका झेबा परकार यांनी केले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 17/Feb/2025