रत्नागिरी : स्वच्छता अभियान राबवूनही सर्वत्र प्लास्टिकचा भस्मासुर

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबवूनही प्लास्टिकचा भस्मासुर सर्वत्र पाहायला मिळत आहे. समुद्राच्या भरतीवेळी पुन्हा एकदा समुद्रातील प्लास्टिक किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर येत आहे. गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलित करण्यासाठी बनवलेला तारांचा पिंजरा शोभेचे बाहुले ठरला आहे. काही ठिकाणी या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे; परंतु बहुतांश ठिकाणी या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने किंवा वेळेवर हा कचरा उचलला जात नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. याकरिता मी प्लास्टिकचा कमी वापर करेन आणि हा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाही, याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

रत्नागिरी शहरातील किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी भेट दिल्यास प्लास्टिक कचरा इतस्ततः विखुरलेला पाहायला मिळतो. रत्नागिरी शहर व परिसर पर्यटनदृष्ट्या चांगले आहे; परंतु जर का अशा प्रकारे कचरा दिसत असेल तर पर्यटकांना हे वाईट चित्र पाहावे लागते. दररोज सकाळी कचराकुंड्यांमध्ये प्लास्टिक कचरा दिसतो व त्या ठिकाणी मोकाट गुरे, कुत्र्यांचा वावर असतो. शहरातील
८० फूट मार्गावर पाथरे बागेनजीक व मिरकरवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर अशा दोन कचराकुंड्या आहेत. या ठिकाणी वाईट पद्धतीने कचरा टाकला जातो. यामुळे हा भाग बकाल होत आहे.

पांढरा समुद्र, मांडवी, भाटये, काळबादेवी, मिऱ्या बंदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा विखुरलेला आहे. भरतीवेळी हा प्लास्टिक कचरा वर येतो व ओहोटीच्या वेळेस हा कचरा परत समुद्रात जातो. कचऱ्यामध्ये पिण्याच्या (मिनरल) प्लास्टिक बाटल्या, खाऊचे कागद, टूथपेस्ट, फेस पावडरचे डबे, खोबरेल तेल, शाम्पू, सोडा, सरबताच्या बाटल्या, औषधाच्या रिकाम्या बाटल्या, चपला, थर्माकोल यांचा खच पडलेला दिसतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 18/Feb/2025