रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी उद्घाटन केल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून सकाळी ८ वाजता ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
पदयात्रेच्या पूर्वनियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन कर्पे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे आदी उपस्थित होते.
बुधवारी होणाऱ्या पदयात्रेत एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाइड, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश असेल. ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा टिळक आळीतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाईल. तेथून शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ला मार्गे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर परत येईल. तेथे यात्रेचा समारोप होणार आहे. या पदयात्रेदरम्यान मांडवी समुद्रकिनारा येथे श्रमदान करण्यात येणार आहे. ढोल व लेझीम पथक, विविध स्तरावरील पुरस्कारप्राप्त खेळाडू सहभागी होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 19-02-2025












