रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रमासह महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. या वैद्यकीय सेवेने जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यातील २५ हजार ६३४ आपत्कालीन रुग्णांना सेवा दिली असून, रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली आहे.
गंभीर परिस्थितीत रुग्णांपर्यंत जलद पोहोचवण्यासाठी शहरी, दुर्गम, आदिवासी भाग आणि महामार्ग याचा समावेश करून १०८ रुग्णवाहिका ही सेवा २४ तास दिली जाते. गरजूंना तत्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी वचनबद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत सध्या १७ रुग्णवाहिका अहोरात्र सेवा देत आहेत. जिल्ह्यात १०८ च्या एकूण १७ रुग्णवाहिका आहेत. यापैकी चार रुग्णवाहिका व्हेंटिलेटरसह अॅडव्हान्स लाईफ सपोर्टन अद्ययावत आहेत. १३ रुग्णवाहिका बेसिक लाईफ सपोर्टयुक्त आहेत.
१०८ रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी वर्षात सर्वाधिक २१ हजार ३१० कॉल वैद्यकीय कारणांसाठी करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक कॉल हे गरोदर माता प्रसुती यासाठी होते. यासह २२२ अपघात, ५८ जळीत रुग्ण, २९० विषबाधा, ४१३ कार्डियाक तर ८४७ प्रसुती रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या आणि दुर्गम ग्रामीण भागांचा विचार करता रुग्णवाहिकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत या सेवेला रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक विशाल पवार यांनी केले आहे.
पालकमंत्री सामंत यांनी केले कौतुक
जिल्ह्यातील रुग्णवाहिकांवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिकाच्या चालकांकडून दिला जाणाऱ्या या अविरत सेवेबद्दल पालकमंत्री उदय सामंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे कौतुक केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 20/Feb/2025
