दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेवर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया..

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावरील एका खटल्यात दोन वर्षांचा करावास ठोठावण्यात आला आहे. यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपदासह आमदारकीही जाण्याची शक्यता आहे.

यावर कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांची प्रतिक्रिया आली आहे.

ही राजकीय केस होती. तुकाराम दिघोळे हे त्यावेळेस राज्यमंत्री होते. त्यांचे आणि माझे वैर होते, त्या वैरातूनच त्यांनी माझ्यावर केस केली होती. या केसचा निकाल आज ३० वर्षांनी लागला आहे. माझ्या राजीनामाची मागणी होऊ शकते, या संदर्भात मी हायकोर्टात जाणार असल्याचे, कोकाटे यांनी स्पष्ट केले.

निकाल पत्र हे मोठे आहे मी अजून वाचले नाही. ते वाचून मी आपल्याला सर्व सांगेन. नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते केलेले आहे. राजीनाम्याची मागणी होऊ शकते. न्याय मागण्याचा अधिकार नागरिक म्हणून मला आहे. हे प्रकरण 30 वर्षांपूर्वीचे आहे, तेव्हा मी नुकताच राजकारणात प्रवेश केला होता. मी आमदार होतो की नाही ते देखील मला माहिती नाही. तो काळ आणि आजचा काळामध्ये फरक आहे, असे कोकाटे यांनी म्हटले. याचबरोबर नंतरच्या काळात दिघोळे आणि माझे चांगले संबंध तयार झाले होते. सलोख्याचे संबंध होते, असे स्पष्ट करताना कोकाटे यांनी आपण रितसर जामीन घेतला असल्याचे स्पष्ट केले.

प्रकरण काय…
१९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. ३० वर्षांनी या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह दोघांनाही न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. भारतीय दंड विधान ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 20-02-2025