धनंजय मुंडेंना Bell’s palsy दुर्मिळ आजाराचे निदान, सलग दोन मिनिटही बोलता येत नसल्याची माहिती

मुंबई : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गेल्या काही 2 महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात असून बीडमधील हत्याप्रकरणातील आरोपींशी जवळीक असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

त्यातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या कार्यकाळत कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे धनंजय मुंडेंवर आरोपांचा मालिका सुरू असतानाच त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम घेत आहेत. दरम्यान, डोळ्याच्या आजारातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आता धनंजय मुंडेंना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, असे त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले.

माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ.टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे, सध्या एक-दोन कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही, अशी माहिती मंत्री मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टममधून दिली. तसेच, याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल, असेही धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे.

बेल्स पाल्सी म्हणजे काय? (What is Bell’s Palsy)

“बेल्स पाल्सी” ही एक मेंदूशी संबंधित म्हणजेच न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस (फेशियल नर्व) कमजोर होते किंवा प्रभावित होते, त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते.

बेल्स पाल्सीची लक्षणे:

– चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा
– डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न करता येणे
– बोलताना किंवा खाताना अडचण येणे
– चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा सुन्न वाटणे
– चव जाणवण्यात अडचण
– कानाजवळ वेदना किंवा संवेदनशीलता वाढणे

बेल्स पाल्सीची कारणे:

व्हायरस संसर्ग (जसे की हर्पीस व्हायरस)

अचानक थंडी लागणे किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

जास्त तणाव किंवा मानसिक दडपण

मधुमेह (डायबिटीज) किंवा इतर काही आरोग्य समस्या

उपचार आणि काळजी:

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्टेरॉइड किंवा अँटीवायरल औषधे घेणे

फिजिओथेरपी आणि चेहऱ्याच्या हालचालींशी संबंधित व्यायाम करणे

प्रभावित भागावर मालिश आणि गरम पाण्याने शेक करणे

डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आई ड्रॉप्स वापरणे

बहुतांश प्रकरणांमध्ये बेल्स पाल्सी काही आठवड्यांत किंवा महिन्यांत आपोआप बरी होते.

मात्र, लक्षणे जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 20-02-2025