रत्नागिरी : जिल्हा पोलीस विभागाला १० स्कॉर्पिओ, १४ सी प्रहरी (ई बाईक) तसेच व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे उद्घाटन येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, माजी शिक्षण सभापती विलास चाळके आदी उपस्थित होते.
मोबाइल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, पोलीस विभागाला लागणारी वाहने रत्नागिरीत सर्वांत जास्त डीपीसीमधून दिली आहेत. पोलिसांनी सुखकर आयुष्य जगले पाहिजे. त्यांच्यावरील ताण कमी झाला पाहिजे. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, त्यासाठी १७८ कोटीमधून पोलीस निवास इमारत उभी राहत आहे. मुख्यमंत्री महोदयांचा ७ कलमी कार्यक्रम केवळ १०० दिवसांचा आराखडा न राहता, ३६५ दिवस कार्यक्रम चालला पाहिजे. समाजाला पोलिसांची आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि पोलिसांनाही जनतेविषयी प्रेम असले पाहिजे.
आक्षेपार्ह पोस्टवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा. देशात धर्माधर्मात भांडणे लावणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखला करावा. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र सीसीटीव्ही लावले जातील. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यावर भर राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.
आ. जाधव म्हणाले, नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली आहे. सायबर गुन्ह्यांची वाढ झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याचा शास्त्रशुद्धपणे उकल करावा लागतो. पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही, तर तो ऑनलाइन दाखल केला जातो. सर्वसामान्य जनतेसाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाताना, त्यांच्या वाहनाच्या काचा खाली असल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, पोलीस विभागामार्फत प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. ठाण्यांमध्ये येणारा नागरिक त्याचे काम झाल्यावर व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये पोलिसांविषयीचा अभिप्राय नोंदवू शकेल. पोलीस विभागांमधील जिल्ह्याची शिस्तीची परंपरा यापुढेही चालू ठेवली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 21-02-2025
