Prabhakar More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या कार्यक्रमाच्या बऱ्याच कलाकारांनी नवी ओळख मिळवून दिली. त्यातील एक नाव म्हणजे प्रभाकर मोरे (Prabhakar More).
काय समजलीव हा त्यांचा डायलॉग चाहत्यांमध्ये फार फेमस आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ते घराघरात पोहोचले आहेत. कॉमेडीचं अचुक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवंल. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या संघर्षकाळावर भाष्य केलं.
एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोदवीर प्रभाकर मोरेंनी त्यांच्या अभिनय प्रवासावर भाष्य करत काही वाईट अनुभवांबद्दल सुद्धा सांगितलं त्यादरम्यान, मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “पूर्वी नाटकाचे दौरे करताना काही प्रमुख कलाकारांनाच काही गोष्टी दिल्या जायच्या. जोपर्यंत आपलं नाव नसतं तोपर्यंत आपल्याला तशी ट्रिटमेंट मिळत नसते. तेव्हा वाईट वाटायचं पण, कदाचित त्याचंही बरोबर असू शकतं. कारण आता नाटकांचे खर्च बजेट वगैरे बघून त्यांनाही काही गोष्टी अवघड जात असतील. बरं प्रमुख नटांना या गोष्टी पुरवणं गरजेचं असतं. कारण त्याच्यावर नाटकांचे शो, बुकिंग अवलंबून असतं. असे अनुभव मला आले आहेत. आता हास्यजत्रा केल्यापासून प्रेक्षकांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे.”
पुढे अभिनेते म्हणाले, “मी मुळचा कोकणातला आहे. त्यावेळी मी फार काही प्रसिद्ध नव्हतो. सिरिअल्समध्ये काम करायचो नाटकांमध्ये काम करायचो. पण, तेव्हा गावचे लोक चेष्टा करायचे. काय रे तू चिपळूणची बाणकुडी भाषा बोलतो, याने काय करिअर होणार आहे का? असं ते म्हणायचे. पण मी म्हणायचो, हे माझ्या उपजीविकेचं साधन आहे. माझा हा व्यवसाय आहे. आर्थिक दृष्टीने मी या कलाक्षेत्रात काम करतो आहे. मी सुपरस्टार होईन, फार प्रसिद्ध होईन या गोष्टी माझ्या डोक्यातच नव्हत्या. पण, मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि अभिनय करत राहिलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझेच नातेवाईक हे सगळं बोलायचे. आता तेच लोकं नातं सांगतात. शिवाय चिपळुणची भाषा (कोकणी भाषा) प्रभाकर मोरेंनी मोठी केली, असं लोकं म्हणतात.” असा खुलासा त्यांनी मुलाखतीमध्ये केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 22-02-2025
