मुंबई : Maharashtra ST : कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बससह ड्रायव्हरला मारहाण करणे आणि काळं फासण्यात आल्याच्या घटनेवर आता कडक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. जे झालं ते चुकीचं झालं, तसे व्हायला नको होतं अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
यापुढे असं काही घडल्यास त्यावर कडक भूमिका घेण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही यासंदर्भात विचार केला जाईल असं सरनाईक म्हणाले.
प्रताप सरनाईक म्हणाले की, “बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात असायलाच हवे. हे बाळासाहेबांनी सुरू केलेले हे आंदोलन आहे. या संदर्भात येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आणि योग्य ती भूमिका घेणार आहे.”
मराठी एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना घडली. कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का? अशी विचारणा करत मारहाण करण्यात आली. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. चित्रदुर्ग जवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. त्यानंतर त्याचे प्रतिसाद महाराष्ट्रात उमटल्याचं दिसून आलं.
सुरक्षा दिली तर कर्नाटकात जाणार
या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी आता आम्हाला सुरक्षा दिली तर आम्ही कर्नाटकात बस घेऊन जातो अशी भूमिका घेतली आहे. कन्नड संघटनाच्या मराठी द्वेषामुळे निष्कारण भाषिक द्वेष निर्माण होऊन निष्कारण जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
शनिवारी सकाळपासून महाराष्ट्राच्या बस कर्नाटकात आलेल्या नसून त्यामुळे बेळगावहून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची पंचाईत झाली. सावंतवाडी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, मिरज, सांगली येथे जाण्यासाठी प्रवासी बस स्थानकावर थांबून आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 22-02-2025
