राजापूर : शासनाच्या पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टीक कार्यक्रमांतर्गत शेतजमीन आधार कार्डाशी संलग्न करून फार्मर युनिक आयडी काढणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. त्यासाठी येथील राजापूर तहसीलदार कार्यालय आणि पाचल ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांशी संवाद साधत अॅग्रिस्टीक योजनेची शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच फामर्र युनिक आयडी शेतकऱ्यांनी काढा असे आवाहन तलाठी सतीश शिंदे यांनी केले.
पाचल येथे झालेल्या या कार्यक्रमाला पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, माजी उपसरपंच किशोर नारकर, मंडळ अधिकारी श्रीमती गावीत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर, तलाती सतीश शिंदे, ग्रामसेवक श्री. कांबळे, तलाठी श्री. कांबळे, कोतवाल अमित चिले, विश्वास जाधव, ग्रामपंचायत कमर्चारी कल्पेश सुतार, नंदू पांचाळ, ऑपरेटर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणे त्यांच्या शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून देणारा फार्मर युनिक आयडी देण्यात येणार आहे. या आयडीच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याची माहिती एकत्र संकलित होणार आहे. जेणेकरून त्या माहितीच्या आधारे शासनाला कृषी विषयक धोरण वा योजना राबविणे अधिक सुलभ होणार आहे.
या व्यतिरिक्त फार्मर युनिक आयडीमुळे शेतकऱ्यांना पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज, पिकांबाबत सल्ला, हवामानाबाबत माहिती व सल्ला, आपत्ती सल्ला व प्रतिसाद, बाजारभावाबाबत सल्ला, किड व इतर रोगांबाबत सल्ला, कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला, मृदा आरोगय माहिती यांसारखी शेतीपूरक माहिती उपलब्ध होणार आहे.
सेवा केंद्रावर गर्दी
शेतजमीन आधार कार्डाशी संलग्न करून फार्मर युनिक आयडी काढणे आवश्यक आहे. अन्यथा, शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे फार्मर युनिक आयडी तयार करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्र सोबत घेऊन शेतकरी सेवा केंद्रावर हजेरी लावत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 25/Feb/2025














