कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

देवगड : दक्षिण कोकणची काशी ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. २६ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी दर्श अमावास्या महापर्वणी तीर्थस्नानाचा योग असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांचा ओघ वाढणार आहे. यात्रेचा कालावधी दोन दिवसांचा असल्याने यावर्षी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार आहे. कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली असून शिवभक्तांची पावले कुणकेश्वरक्षेत्री वळू लागली आहेत. यात्रोत्सवासाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे. एस्टी, वीजवितरण, पोलिस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, दुरसंचार आदी सर्व विभागांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी विविध खेळण्यांचे स्टॉल देखील उभारले आहेत.

कुणकेश्वर भेटीसाठी १० देवस्वाऱ्या
महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीसाठी १० देवस्वाऱ्या जाणार आहेत. यामध्ये मिठबांव श्रीदेव रामेश्वर देवस्वारी ३०० वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी जाणार आहे. तर श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचरा श्री देव रामेश्वराची देवस्वारी ३९ वर्षांनी, शिरगाव श्री देवी पावणाईदेवी २२ वर्षांनी व देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्वा रामेश्वर देवस्वारी १२ वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी जाणार आहेत.

याशिवाय श्री देव माधवगिरी माईण कणकवली, श्री गांगेश्वर नारींग्रे, श्री देव जैनलिंग रवळनाथ महालक्ष्मी, पावणादेवी गांगो बिडवाडी कणकवली, श्री देव गांगेश्वर बावशी बेळणे कणकवली, श्री पावणादेवी हुंबरठ कणकवली, श्री गांगेश्वर पावणाई भावई दाभोळे या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला जाणार आहेत. यावर्षीचा १० विक्रमी देवस्वाऱ्या कुणकेश्वरमध्ये येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 26/Feb/2025

Tata motars punch