लव्ह जिहादविरोधात येत्या अधिवेशनात कायदा करावा : सुनील घनवट

चिपळूण : शासनाने येत्या अधिवेशनात लव्ह जिहाद संदर्भात कायदा करावा. तसेच देशात घुसलेले रोहिंगे मुस्लिम व बांगला देशी यांना शोधून बाहेर काढावे, अन्यथा राज्यात हिंदुत्ववादी संघटना जनआंदोलन उभारील, असा इशारा महाराष्ट्र व छत्तीसगड हिंदू जनजागृती समिती राज्य संघटक सुनील घनवट यांनी मंगळवारी (दि. २५) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला.

चिपळुणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मंगळवारी महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू जनजागृती समितीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेत घनवट यांनी हिंदुत्वासंदर्भात विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

प्रामुख्याने शासनाने रोहिंगे मुस्लीम व बांगला देशी घुसखोर यांना कोम्बिंग ऑपरेशन करून तातडीने देशाबाहेर काढावे. बांगला देशी घुसखोर कोकणात प्रामुख्याने चिपळूण, रत्नागिरीत आढळून आले आहेत. मुंबईत आढळलेल्या घुसखोरांचा जन्म दाखला हा रत्नागिरी, चिपळूण व कोकणातून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. घुसखोरांना शोधून काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून शासनाने सीडीआरचा तपास करून कोणाचा संपर्क बांगला देशाशी आहे, अशांना शोधून काढावे. तसेच त्यांना दाखले देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी. लव्ह जिहादच्या विरोधात शासनाने या अधिवेशनात कायदा करावा. त्याचप्रमाणे वक्फ कायदा पूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

कोकणात वक्फच्या अडीच हजार एकर जागा आहेत, तर दुसरीकडे शासनाने मंदिर व देवस्थान आपल्या ताब्यात घेऊन हिंदुत्ववाद्यांवर अन्याय केला आहे. शासनाने केलेल्या मंदिर अधिग्रहण कायद्याप्रमाणेच मशिद व मदरसे यांच्यासाठीही कायदा करावा, अन्यथा आमच्या जागा देवस्थानच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दिलीप देशमुख, निवृत्त धर्मदाय आयुक्त महेश पोंक्षे, महाराष्ट्र मंदिर महासंघ चिपळूण तालुका संयोजक रमेश कडू, महाराष्ट्र मंदिर महासंघ दापोली आणि मंडणगड लक्ष्मण गुरव, महाराष्ट्र मंदिर महासंघ दापोली तालुका संयोजक उमेश गुरुव, सकल गुरव समाज संघटना, सुभाष गुढेकर, कृष्णा पंडित, गणेश उतेकर, प्रदीप चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक कदम उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 26/Feb/2025