चिपळूण : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावर मराठी भाषेचे महत्त्व वाढले आहे. मराठी बरोबरच प्राकृतला देखील महत्त्व आले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी कुसुमाग्रज यांचे अध्ययन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या बाबत आपण तेथील विद्यापीठाशी संपर्क साधल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळुणात सांगितले.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलताना ना. सामंत म्हणाले, मराठी भाषेचा कायम सन्मान करण्यासाठी यापुढे बाल, युवा व महिला साहित्य संमेलनेही घेतली जातील. त्याचे आयोजन शासनाचा मराठी भाषा विभाग करणार आहे. मराठी बोलण्यात कोणताही कमीपणा नाही. मी परदेशातही मराठीत बोलतो, तरीही हजारो कोटींची गुंतवणूक राज्यात आणली आहे. मराठी माणसाला याच भाषेने वेगळी ओळख दिली आहे. त्यामुळे या भाषेवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.
मराठी उद्योजक घडले पाहिजेत, असा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. यातून आपण राज्यात जिल्हास्तरावर परिषद घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. चिपळूणवर माझे रत्नागिरी एवढेच प्रेम आहे. कोणत्याही विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी तयार केलेले रत्नाक्षरे हे पुस्तक राज्यात आदर्श ठरावे असे आहे, असेही ते म्हणाले.
ना. सामंत रत्नागिरीप्रमाणेच चिपळूणवर प्रेम करतील…
रत्नागिरीप्रमाणेच उद्योगमंत्री उदय सामंत हे चिपळूणच्या विकासावर लक्ष देतील. चिपळूणचा पूरप्रश्न कायम आहे. त्यासाठी महिनाभरात अडीच हजार कोटींचा प्रकल्प शासनाला सादर होईल. तो मंजुरीसाठी त्यांनी प्रयत्न करावा. चिपळूण शहरातील बहादूरशेख चौक ते चिंचनाका व चिंचनाका ते पॉवर हाऊस या रस्ता रुंदीकरणासाठी ना. सामंत यांनी निधी उपलब्ध करून द्यावा. या शिवाय चिपळूण व संगमेश्वर विकासासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे.असा आपला विश्वास आहे, असे आ.निकम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 27-02-2025















