भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता उपक्रमांचे आयोजन; मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे आवाहन
रत्नागिरी:
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत देशभर ‘जनजातीय गौरव पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आदिवासी पाड्यांवर जलक्रांतीचा जागर केला जाणार असून, पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे विशेष आयोजन करण्यात येणार आहे.
नळजोडणी, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि गुणवत्ता तपासणीवर भर

या पंधरवड्या दरम्यान आदिवासी वस्त्यांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. प्रत्येक घराला नळजोडणी उपलब्ध करून देणे, सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
याशिवाय गावागावांत जलजागृती मोहीम राबवली जाणार आहे. ग्रामपाणी व स्वच्छता समिती, पाणी समिती, आदिवासी युवक आणि महिलांच्या सक्रिय सहभागातून पाणीपुरवठा योजनांचे योग्य संचालन व देखभाल दुरुस्तीबाबत जनजागृती केली जाणार आहे. यासाठी गावपातळीवर प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीचे विशेष कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे आवाहन
जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या या जनजातीय गौरव पंधरवड्यामध्ये आणि ग्रामसभांमध्ये नागरिकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांनी केले आहे.













