संगमेश्वरातील पर्यटन क्षेत्रासाठी १० कोटींचा निधी : आमदार शेखर निकम

देवरुख : श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या पर्यटनाची गुणवत्ता आणि सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

या कामांमध्ये मार्लेश्वर मंदिर ते दत्त मंदिरदरम्यान नदीवर कमानी पूल (आर्च ब्रीज), श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरात गॅलरी भक्त निवास व सभामंडप, प्रमुख पालखी मार्गाची सुधारणा याचा समावेश आहे. यासह स्वच्छतागृह आणि चेंजिग रूम, वाहनतळाचा विकास, विद्युतीकरण त मैदान विकास सर्व भागांत विद्युत पुरवठा व नूतनीकरण, धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंती यासह अनेक कामांचा समावेश त्यात आहे.

तळेकांटे, देवरुख, मुरादपूर, मारळ, बामणोली, खडीकोळवण, ओझरे, कळकदरा आणि मारळ मार्लेश्वर रस्ता रुंदीकरणासाठी १८५ कोटी रुपये मंजूर झाले असून, याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. याबरोबरच टिकलेश्वर देवस्थान विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात देवस्थानकडे जाणारा रस्ता, स्वच्छतागृह आणि पाखाडी बांधणे, रेलिंग्ज अशी कामे होणार आहेत. या देवस्थानसाठी आणखी ३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे

छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठीही निधी
महिपतगड प्रकल्पासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये रस्ता, भिंत आणि मेघडंबरी अशा प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले असून, मेघडंबरी, मुख्य प्रवेशद्वारासाठी कमान यासह अनेक कामांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 28/Feb/2025