◼️ चाकरमानी गावात दाखल होण्यास सुरुवात
रत्नागिरी : कोकणात अनेक प्रथा-परंपरा आहेत. विविध सण याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. होळी हा यातीलच मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण. फाल्गुन शुद्ध पंचमीला होळीपूजन करून कोकणातील शिमगोत्सवाची सुरुवात होते. या वर्षीच्या शिमगोत्सवाची आजपासून होळीपूजनाने सुरुवात होणार आहे.
कोकणात होळीपूजनाने शिमगोत्सवाची सुरुवात होते. यावेळी गावागावांत वाडी-वस्तीवर होळीपूजन केले जाते. यासाठी पहिल्या दिवशी शेवराचे झाड तोडून त्याची पूजा करून त्याचे सलग 10 ते 11 दिवस पूजन केले जाते. यावेळी गावकरी मोठ्याने फाका अन् बोंबा मारून या शिमगोत्सवाची रंगत वाढवत असतात. यात मुख्य म्हणजे होळीच्या सणात बाहेर पडणारे खेळे सर्वांचे आकर्षण ठरतात. अनवाणी पायाने गावोगावी फिरणारे खेळे आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरत असतात. यातील संकासुर आणि गोमू लहान-थोरांचे मनोरंजन करतो. होळीच्या शेवटच्या दिवशी गावच्या ग्रामदेवतांच्या सहाणेवर मोठा होम सजवून तो पेटवला जातो. यावेळी नव्याने लग्न झालेले नवरदेव होमात नारळ टाकतात. माडवळ नाचवण्याची मजादेखील यावेळी वेगळीच असते.
यानंतर पुढील पंधरा दिवस ग्रामदेवतांच्या पालख्या गावात घरोघरी फिरतात. यासाठी मुंबई-पुण्यातून तसेच शहरातील मंडळी आपल्या गावात शिमगोत्सव व देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात.
या शिमगोत्सवाचा आणखी एक टप्पा म्हणजे पालखी भेट सोहळा. यावेळी दोन पालख्यांची होणारी भेट सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 04-03-2025














