Abhijeet Dipke Education Ministry Transfer: अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून धूळफेक; भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती तरुणांचा थेट अपमान; अभिजीत दीपके आणि रोहित पवार आक्रमक

विनीत जोशी यांची शिक्षण मंत्रालयातून हकालपट्टी; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी अन् विरोधक ठाम

नवी दिल्ली: Abhijeet Dipke Education Ministry Transfer (शिक्षण मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अभिजीत दीपके यांची टीका) प्रकरणी जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठे फेरबदल केले आहेत. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी राजस्थान केडरचे अधिकारी नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर केरळ केडरचे अधिकारी टी. के. अनिल कुमार यांची शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदी वर्णी लागली आहे. मात्र, या बदल्यांवरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

उत्तरदायित्व निश्चित करण्याऐवजी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन: अभिजीत दीपके कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सर्वेसर्वा अभिजीत दीपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत या बदल्या म्हणजे देशातील तरुणांचा थेट अपमान असल्याचे म्हटले आहे. ‘एक्स’ (ट्विटर) वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दीपके म्हणाले, “सरकार उत्तरदायित्व निश्चित करण्याऐवजी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. काल रात्री शिक्षण सचिवांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अशा एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांच्यावर आधीच कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. NEET आणि पेपरफुटीचे संपूर्ण संकट भ्रष्टाचाराशी जोडलेले असताना, एका अधिकाऱ्याला हटवून दुसऱ्या वादग्रस्त अधिकाऱ्याला आणणे हा तडजोडीचा मार्ग असू शकत नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही.”

घोटाळेबाजांना बढती देणे हीच भाजपची कार्यपद्धती: रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयावर जोरदार तोफ डागली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, “NEET घोटाळ्याला जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी असताना, अधिकाऱ्यांची बदली करून सरकार लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करत आहे. नव्या सचिवांवर स्वतःच्या कुटुंबाला ‘हॉर्टिकल्चर मिशन’मधून १.१६ कोटींची सबसिडी मिळवून दिल्याचा आरोप आहे. याआधी NTA मधील घोटाळ्यानंतर सुबोधकुमार सिंग यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून प्रमोशन देण्यात आले होते. ज्यांनी घोटाळे केले त्यांनाच पदोन्नती द्यायची, हीच भाजप सरकारची पद्धत (Modus Operandi) आहे का?”

केंद्रातील या सनदी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत फेरबदलांमुळे विद्यार्थ्यांमधील आणि विरोधी पक्षांमधील असंतोष अधिकच वाढला असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 24-07-2026