Machal Cleanliness Drive: ‘मिनी महाबळेश्वर’ माचाळ येथे पालू ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम; पर्यटकांनी टाकलेल्या कचऱ्याची केली विल्हेवाट

दोन टेम्पो कचरा केला जमा: प्रशासक सागर गाडे यांच्या पुढाकाराने माचाळ परिसर केला स्वच्छ


लांजा:

Machal Cleanliness Drive (माचाळ स्वच्छता मोहीम) अंतर्गत ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लांजा तालुक्यातील माचाळ येथे विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून परिसरात अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या केर-कचऱ्याची पालू ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने साफसफाई करून योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

दोन टेम्पो कचरा गोळा करून लावली विल्हेवाट
माचाळ येथील माळरान, देवस्थान, रस्ते आणि धबधबा क्षेत्र या परिसरात पर्यटकांनी अस्ताव्यस्त फेकलेला दोन टेम्पो कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. पालू ग्रामपंचायतीचे प्रशासक सागर गाडे यांच्या पुढाकाराने हा स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेत गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पर्यटकांच्या गर्दीमुळे अस्वच्छतेची समस्या
सध्या लांजा तालुक्यात मुसळधार पाऊसाचा जोर सुरू असून वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी तालुका, जिल्हा तसेच परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक माचाळ येथे गर्दी करत आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, हिरवीगार वनराई, डोंगर कड्यांवरून कोसळणारे धबधबे, वन्य पशू-पक्षी आणि मुचकुंद ऋषींची गुहा या निसर्गसंपन्न वैविध्यतेमुळे माचाळ हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. मात्र, पर्यटकांकडून खाऊचे प्लास्टिक कागद, पिशव्यासह बाटल्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक पत्रावळी आणि रॅपर मोठ्या प्रमाणावर माळरानावर उघड्यावर टाकले जात असल्याने दुर्गंधी व अस्वच्छता पसरून स्थानिक गावकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

नैसर्गिक अधिवास जपण्याचे पालू ग्रामपंचायतीचे आवाहन
निसर्गसौंदर्याने नटलेल्या माचाळ गावात पर्यटनाचा आनंद घेताना येथील संवेदनशील नैसर्गिक अधिवासाला आणि पर्यावरणाला बाधा पोहोचू नये. त्यामुळे पर्यटकांनी येथे येताना कचरा उघड्यावर न टाकता स्वच्छता राखावी, असे आवाहन पालू ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 24-07-2026