रत्नागिरी : ‘लाडकी बहीण” योजनेचा मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारीमधील हप्ता हा दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे महिनाअखेर जमा होईल अशी अपेक्षा होती; पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ४ लाख १७ हजार ‘लाडक्या बहिणी’ डोळे जमा होणाऱ्या हप्त्याकडे लागले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ४ लाख १७ हजार लाभार्थींना महिन्याला सुमारे ६१ कोटी रुपये वाटप होते. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकांत न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता जिल्हास्तरारावर सुरू आहे. ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने येथील जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत सांगण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येऊन या निकषांनुसार आतापर्यंत राज्यातील लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे विलंब लागला की नव्या निकषात आपले नाव कमी झाले अशीही चिंता अनेक लाडक्या बहिणींना लागून राहिली आहे.
दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रच
आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जातेय. ही रक्कम येत्या आठ दिवसांत पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 04/Mar/2025














