चिपळूण : कुंभार्ली घाटाच्या सुरक्षेसाठी सर्वपक्षीयांची सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर धडक

चिपळूण : कुंभार्ली घाटामध्ये वारंवार होणारे अपघात यामुळे निष्पाप जीव जात आहेत, याबाबत सर्व पक्षांतील नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामसे यांची भेट घेऊन घाटातील सुरक्षेबाबत सखोल चर्चा केली. अखेर सर्व पक्षांतील नेते आणि अधिकारी संयुक्तरीत्या घाटाची पाहणी करून उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन कार्यकारी अभियंता रामसे यांनी दिले.

यावेळी इंदिरा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सभापती शौकत मुकादम, मनसे तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, सामाजिक कार्यकर्ते महादेव चव्हाण, तळसर माजी सरपंच विजय साळुंखे, केशव लांबे, राजाभाऊ नारकर, बाबा चव्हाण, सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, सुरेश पाथरे, राकेश शिंदे, संजय जाधव, अनिल शिंदे, खालिद पटाईत आदी उपस्थित होते.

यावेळी कुंभार्ली घाटातील अनेक प्रश्न उपस्थित झाले. रस्त्यालगत असलेले संरक्षक भिंत, गटारे, तोडण्यात आलेली झाडे, घाटातील मोडकळीस आलेले कठडे त्यांची उंची यावर जवळपास दीड तास चर्चा झाली. तसेच सायंकाळी ६ नंतर कुंभार्ली घाटातील अवजड वाहने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री, आमदार व पालकमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्व विषयांवर सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच घाटातील परिस्थितीची संयुक्तरीत्या पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुहागर विजापूर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे वर्ग करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत, त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता रामसे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 05/Mar/2025