रत्नागिरी : प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रांतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना नारळ रोपांचे वाटप

रत्नागिरी : शहरातील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रांतर्गत सुधागड-पाली येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या आदिवासी उपाययोजना प्रकल्पांतर्गत नारळ उत्पादन तंत्रज्ञान विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी शेतकऱ्यांना नारळ रोपांचे वाटप करण्यात आले.

सुधागड पाली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुतार यांनी केले. या प्रशिक्षण वर्गात तांत्रिक सत्रामध्ये नारळ लागवड या विषयावर रोहा येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय दामोधर, नारळावरील कीड रोग व्यवस्थापन यावर कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.

नारळ लागवडीमध्ये खते आणि पाणी व्यवस्थापन, आंतरपीक, मिश्र पीक यावर नारळ केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण मालशे यांनी माहिती दिली. त्यांनी अर्थाजनाचे एक साधन म्हणून नारळ रोपाची लागवड करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी आणि नारळ संशोधन केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 05/Mar/2025

Arihant 3