चिपळुणात उष्णतेचा पारा ४० अंशांवर!

चिपळूण : मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा उच्चांकी झाला आहे. चिपळूण परिसरात ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान वाढले आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिकांसह व्यापारी हैराण झाले आहेत.

दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तापमान उच्चतम पातळी गाठते. मात्र, या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच ४० ते ४१ अंशांपर्यंत तापमान जाऊ लागले आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक आणि मुलांवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

उष्णतेमुळे होणारे आजार आता वाढू लागले असून डोळे येणे, डोळे लाल होणे, ताप व अन्य साथीचे रोगदेखील पसरू लागले आहेत. विशेषकरून उन्हाळे बाधणे, घामोळी असे प्रकार दिसून येत आहेत. सकाळी ११ वा. पासून सायंकाळी ४ पर्यंत परिसरात ४१ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जात आहे. आगामी काही दिवसांत या तापमानात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे नागरिक सरबत, फळांचे रस, नारळ पाणी, फळे, द्राक्षे, आइस्क्रीम, ताक, दही, लस्सी, कलिंगड यांचा आधार घेत आहेत. उसाच्या रसाची मागणीही वाढली आहे. दुपारी १२ ते सांयकाळी ४ पर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात ऐन सणासुदीच्या दिवसांत मंदी जाणवत आहे. होळीचा महिना सुरू झाला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचना
या कालावधीत नागरिकांनी जास्ती जास्त पाणी प्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त तापमान असणाऱ्या दुपारी १२ ते ४ या वेळत बाहेर पडू नये, बाहेर पडल्यास पांढरे कपडे, अॅपरन, स्कार्फ याचा वापर करावा, अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. आता शेतीच्या मशागतीची कामेदेखील सुरू झाली आहेत. ठिकठिकाणी वणवे लागण्याचे प्रकार घडून येत आहेत. त्यात तापमानवाढीमुळे नागरिकांसह शेतकरी आणखीनच हैराण झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 06/Mar/2025