चिपळूण : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संघटना सोडून ज्यांना जायचे आहे, त्यांनी वाट न बघता सोडून जावे. आम्ही संघटना सांभाळण्यास खंबीर आहोत. संघटना ठेकेदारीवर चालवायची नाही. अशा स्वरूपाचा सूर चिपळूण येथे झालेल्या उबाठा शिवसेना संघटनेच्या चिपळूण कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठकीत उमटल्याने अनेक पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेचा चांगलाच धक्का बसला.
सोमवारी सायंकाळी उशिराने चिपळुणातील अतिथी हॉटेल सभागृहात चिपळूण शहर परिसरातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी पद व सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांनीदेखील सदस्यत्व व पदाचा राजीनामा दिला.
राज्यभरात उबाठा सेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधी समर्थक शिवसैनिकांसह शिंदे सेना, भाजप आदी पक्षात प्रवेश करू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उबाठा सेनेची पडझड रोखण्यासाठी चिपळुणात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीसाठी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे यांसह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक अत्यंत गोपनीय व खास निरोप देऊन बोलाविण्यात आली होती. मात्र, अखेर या बैठकीतील शिवसैनिकांचा आक्रमक सूर चर्चेच्या माध्यमातून शहरात उघड झाला. सुमारे अडीचशेहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रामुख्याने या बैठकीत शहरप्रमुख पदावर कुणाची नियुक्ती करावी, या विषयावर चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट शिवसेना संघटना व स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या केलेल्या संघटनेबाबत भावना व्यक्त केल्या.
संघटनेने गेल्या अनेक वर्षात ज्यांना भरभरून दिले, असेच आता पडत्या काळात संघटना सोडून जात आहेत.
मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही संघटना सोडणार नाही. कितीही संकटे आली तरी तेवढ्याच ताकदीने सामोरे जानू, संघटना अधिक जोमाने वाढवून भविष्यात एकहाती सत्ता मिळवू, संघटना ठेकेदारीवर चालवायची नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जो आदर्श व विचार आम्हाला दिले आहेत, त्या माध्यमातून शिवसैनिक म्हणून समाजकारणाच्या माध्यमातून संघटना उभी करू. ज्या कोणाला संघटना सोडून जायची आहे, त्या नेते, पदाधिकाऱ्यांनी संघटना सोडून जावे, असा इशारा देण्यात आला.
संघटना पुन्हा उभारी घेण्यास सज्ज
संघटना सांभाळण्यास व पुन्हा जोमाने उभारण्यास आम्ही खंबीर आहोत, अशा स्वरूपाचा आक्रमक सूर या बैठकीत उमटल्याने आयोजकदेखील काही काळ निःशब्द झाले. एकूणच या बैठकीतील उपस्थित प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे संघटना पुन्हा उभारी घेण्यास सज्ज झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 06/Mar/2025














