शेतकर्यांना पेरणी थांबवण्याचा सल्ला
पुणे: मान्सून सर्वदूर पोहोचला असून त्याने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या रविवारपर्यंत (दि. २८) राज्यातील काही भागांत मुसळधार, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा ९ दिवस विलंबाने महाराष्ट्रात दाखल झाला असला, तरी अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे त्याला मोठी गती मिळाली आहे. सामान्यतः १५ जूनच्या सुमारास संपूर्ण राज्य व्यापणारा मान्सून सक्रिय झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. महाराष्ट्रासोबतच मान्सूनने गुजरात आणि मध्य प्रदेशातही यशस्वी प्रवेश केला आहे.
पेरणीची घाई न करण्याचे कृषीमंत्र्यांचे आवाहन
राज्यात मान्सूनचे आगमन लांबल्याच्या पार्श्वभूमीवर, शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. जमिनीमध्ये योग्य ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करणे धोक्याचे ठरू शकते. हवामान विभागाच्या सल्ल्यानुसार, जोपर्यंत जमिनीत कमीत कमी ४ ते ५ इंच ओल जात नाही, तोपर्यंत शेतकर्यांनी बियाणे टाकू नये. पुरेशा पावसाअभावी घाईघाईने पेरणी केल्यास बियाणे न उगवण्याची शक्यता असते, ज्यामुळे शेतकर्यांवर ‘दुबार पेरणी’चे मोठे संकट ओढावू शकते. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच पुढील निर्णय घ्यावा, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत पहिल्याच पावसात तुंबई; २४ तासांत विक्रमी पाऊस
मुंबई आणि उपनगरांमध्ये झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने संपूर्ण शहराची तुंबई केली आहे. बुधवारी मध्यरात्री मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, मालवणीमध्ये सर्वाधिक ३४० मि.मी. आणि परळमध्ये ३३४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले असून, मालाड येथील झोपडपट्टीमधील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. मंगळवारी सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीनंतर पुन्हा रौद्ररूप धारण केले. पहाटेपर्यंत मुंबईच्या काही भागांत २०० ते ३०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे.
किनारपट्टी आणि इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम
गेल्या २४ तासांत संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टीसह नाशिक, जळगाव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा मारा अधिक राहिला आहे. प्रामुख्याने मुंबई, कोकण आणि गोव्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असल्याचे दिसून आले. राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 25-06-2026














