जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा, ‘आप’-‘टीएमसी’सह शिंदे गटाला संधी?
नवी दिल्ली: PM Modi Cabinet Reshuffle अर्थात मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज (२४ जून) केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. दोन मोठ्या राजकीय घडामोडींमुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. काल (२३ जून) सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदभारचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो तातडीने स्वीकारला आहे. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आयोजित पद्म पुरस्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारकडून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल केले जातील, अशा चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील काही खासदारांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा; रवनीत सिंग बिट्टू यांच्या भूमिकेकडे लक्ष
भाजपने नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग बिट्टू यांना पुन्हा उमेदवारी नाकारली होती. जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २१ जून रोजी संपल्याने, त्यांनी अखेर काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कुरियन यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचाही कार्यकाळ संपला असला, तरी त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. घटनात्मक नियमांनुसार, खासदार नसतानाही कोणतीही व्यक्ती ६ महिने मंत्रीपदावर राहू शकते. बिट्टू यांनी पंजाबच्या राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा दर्शवली असून, पुढील वर्षी होणारी पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ सूत्राचा होणार परिणाम
भाजपमधील PM Modi Cabinet Reshuffle च्या या प्रक्रियेत ‘एक व्यक्ती, एक पद’ हे अंतर्गत सूत्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हर्ष मल्होत्रा यांची नुकतीच दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर ते सध्या केंद्रात मंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच पंकज चौधरी हे उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्याकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदाची धुरा आहे. या दोन्ही नेत्यांकडे संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यामुळे, पक्षाच्या धोरणानुसार त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विरोधी पक्षांमधून आलेल्या फुटीर खासदारांना मिळणार संधी?
गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांमधील अनेक खासदारांनी बंडखोरी करत सत्ताधारी एनडीए (NDA) आघाडीला पाठिंबा दिला आहे. यामध्ये खालील प्रमुख गटांचा समावेश आहे:
- आम आदमी पार्टी (AAP): राघव चड्ढा यांच्यासह पक्षाशी संलग्न असलेल्या ७ खासदारांनी भूमिका बदलली आहे.
- तृणमूल काँग्रेस (TMC): टीएमसीच्या २८ लोकसभा खासदारांपैकी तब्बल २० खासदार त्रिपुराच्या ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी’मध्ये (एनसीपीआय) विलीन झाले असून त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे.
- शिवसेना (शिंदे गट): उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या ६ खासदारांचा यात समावेश आहे.
या विरोधी पक्षांमधून आलेल्या आणि एनडीएला बळ देणाऱ्या काही प्रमुख खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.
संसदेतील २/३ बहुमताचे गणित आणि आगामी विधानसभा निवडणुका
केंद्र सरकार आणि भाजप संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आपले संख्याबळ आणखी मजबूत करण्यासाठी रणनीती आखत आहे. भविष्यात काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या मंजूर करून घेण्यासाठी सरकारला दोन-तृतीयांश (२/३) बहुमताची आवश्यकता भासणार आहे. याच गणितामुळे विरोधी पक्षांमधील खासदारांची फोडाफोडी सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यातच पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घातल्या आहेत. या राज्यांमधील प्रादेशिक आणि सामाजिक परिस्थितीचा समतोल साधण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर














