चिपळूण : चिपळूण नगर परिषद प्रशासनाने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सक्रिय ठेवली असून या मोहिमेचा धसका घेतल्याने अनेक अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय थाटण्यासाठी अन्य जागांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, मोहिमेतील पथकाने दि. ६ रोजी पुन्हा एकदा मध्यवर्ती बसस्थानक भोगाळे परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केल्याने मुख्याधिकारी भोसले व चिपळूण न.प. प्रशासनाचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.
मागील आठवड्यापासून न.प. प्रशासनाने शहरातील अतिक्रमणे करणाऱ्यांना पूर्वसूचना देऊन अतिक्रमणे हटवली. प्रामुख्याने बाजारपेठ, पानगल्ली, भाजी मंडई तर मुख्यत्वे छत्रपती शिवाजी चौक ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावरील अतिक्रमणे प्रशासनाने काढून टाकली. यापूर्वी अनेकवेळा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मात्र, ती तकलादू ठरली. गरिबांचे कैवारी आणि मसीहाँ समजल्या जाणाऱ्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे प्रशासनाकडून कारवाई होत नव्हती. मात्र, वर्षभरापूर्वी न.प.ची सूत्रे हातात घेणाऱ्या मुख्याधिकारी भोसले यांनी या सगळ्या राजकीय दबावाचा अंदाज बांधून बेधडक कारवाईचा निर्णय घेण्याचे धाडस दाखविले आहे. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागला आहे. परिणामी, न.प.च्या कागदोपत्रावर असलेल्या अतिक्रमण पथकाला आता मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शन व सूचनेखाली अतिक्रमणे हटविण्यास भाग पडू लागले आहे. मागील आठवड्यातील कारवाईनंतर पुन्हा एकदा पथकाने शहरात फेरी मारून अतिक्रमणांच्या माध्यमातून डोके वर काढणाऱ्यांची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी भोगाळे परिसरात पुन्हा काही व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत असून मुख्याधिकाऱ्यांनी सुरू केलेली ही मोहीम पुढे सुरू रहावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
प्रशासनाकडून सहानुभूतीचा विचार केल्यावर त्याचा गैरफायदा अतिक्रमण करणाऱ्या अनेक व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये पालिकेकडून एक परवाना घेऊन त्या बदल्यात चार-चार अतिक्रमण केलेल्या जागांचा वापर, दुसऱ्या व्यावसायिकाला भाडे कराराने देण्याचा प्रकार, तसेच दिलेल्या जागेपेक्षा हळूहळू अधिक जागा व्यापून कालांतराने प्लास्टिक बांबूची शेड उभी करीत अतिक्रमण करण्याचा गैरफायदा घेतला जात असल्याने ही कारवाई स्वागतार्ह आहे, अशाही भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 08/Mar/2025














