चिपळूण : वाशिष्ठी नदीत १३ मार्च रोजी अधिकचे पाणी न सोडण्याची मागणी

चिपळूण : कोकणातील प्रसिद्ध असलेला श्री देवी करंजेश्वरीचा शेरणे काढण्याचा कार्यक्रम येत्या १३ मार्च रोजी साजरा होत आहे. हा कार्यक्रम परंपरेनुसार वाशिष्ठी नदी किनारच्या पेठमाप भाटण येथे होत असतो. कार्यक्रमात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या दिवशी वाशिष्ठी नदीत अधिकचे पाणी सोडू नये, अशी मागणी श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर यांनी मुख्य अभियंता, के. जी. एस. सी. महाजनको, पोफळी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेशवरी देवस्थान, गोवळकोट-पेठमाप, चिपळूणचा शिमगा महोत्सव ११ मार्च ते १४ मार्च दरम्यान साजरा होत आहे. दरम्यान, १३ मार्च रोजी रोजी पेठमाप येथील शेरणे काढण्याचा कार्यक्रम वाशिष्ठी नदी लगत असलेल्या जागेत फार पूर्वापार परंपरागत पद्धतीने केला जाणार आहे. या दिवशी त्या भागात मोठी जत्रा व मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

या दिवशी पौर्णिमची भरती असते. २०२२ साली जास्त पाणी सोडल्यामुळे कार्यक्रमात मोठी अडचण आली होती. तरी नदी लगत असल्यामुळे अनपेक्षित अपघात टाळण्यासाठी त्या दिवशी वाशिष्ठी नदीत अधिकचे पाणी सोडण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 08/Mar/2025