रत्नागिरीतील भोंदू बाबासह ९ जणांवर गुन्हा; वृद्धाला घातला ८५ लाखांचा गंडा

कोल्हापूर : काळ्या जादूचा वापर करून करणी काढण्याची बतावणी करून गंगावेश येथील वृद्धाला ८४ लाख ६९ हजारांना गंडा घातल्याप्रकरणी रत्नागिरीतील भोंदू बाबासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान कणकवली, गंगावेश अशा ठिकाणी पूजा मांडून पैसे उकळले. याबाबत सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७, रा. दत्त गल्ली, गंगावेश) यांनी फिर्याद दाखल केली.

याप्रकरणी भोंदू बाबा दादा पाटील महाराज (पाटणकर), आण्णा ऊर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील ऊर्फ धनश्री काळभोर (सर्व रत्नागिरी), श्री. गोळे (रा. बारामती), कुंडलिक झगडे (रा. जेजुरी), तृप्ती मुळीक (कणकवली), ओंकार, भरत, हरिष (पूर्ण नावे व पत्ता समजू शकलेला नाही) यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फिर्यादी सुभाष कुलकर्णी मूळचे नणंद्रे (ता. पन्हाळा) येथील, सध्या ते गंगावेश परिसरात राहतात. गावाकडील जमिनीबाबत न्यायालयात खटलाही सुरू आहे. तसेच इतर काही कौटुंबिक अडचणीमुळे ते चिंतेत होते.

त्याच्याच मावसभावाने यातून सुटण्यासाठी बारामतीच्या गोळे नावाच्या व्यक्तीला भेटण्याची गळ घातली. १३ फेब्रुवारी २०२३ ला गोळे कुंडलिक झगडे नावाच्या साथीदाराला घेऊन कुलकर्णी यांच्या घरी आला. तुमचे न्यायालयीन वाद, मुलाच्या लग्नाची समस्या दूर करण्यासाठी पाटील महाराज यांना भेटूया, ते निराकरण करतील, असे सांगत कुलकर्णी यांचा विश्वास संपादन केला.

काळी जादू केल्याची बतावणी
फेब्रुवारी २०२३ मध्ये संशयित पाटील महाराज व त्याचे पाच साथीदार कुलकर्णी यांच्या घरात आले. नणंद्रे गावातील काही जणांनी तुमच्या घरच्यांवर करणी केल्याची बतावणी केली. कुलकर्णी यांना कणकवली येथे संशयित तृप्ती मुळीकच्या घरी नेले. फेब्रुवारीच्या अखेरीस पाटील यांच्या घरी पूजा मांडून रोख ११ हजार रुपये घेतले. पूजा सात दिवस करायची असल्याचे सांगून ७ हजार रुपये, शापीत बंध काढण्यासाठी ४० हजार रुपये घेतले.

सोने, चांदीच्या ऐवजावर डल्ला
घरातील अनेक वस्तूंवर काळी जादू केली असून, त्यांचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगून कुलकर्णी यांच्या घरातील साहित्य पितळी हांडे, जुनी भाडी, सागवानी कपाटे, जुने ग्रंथ, लाकडी खुर्चा असे साहित्य टेंपोत भरून नेले.

भोंदू, बुवांवर विश्वास ठेवणे धोकादायक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यातून लोकांनी चिकित्सकपणे अशा बाबींकडे पाहणे गरजेचे आहे. भानामतीसारखे प्रकार खोटे असल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या मदतीसाठी तत्पर आहे. – सीमा पाटील, राज्य सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 05/Oct/2024