चिपळूण : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला श्री देव सोमेश्वर आणि श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवातील शेरणे कार्यक्रमास शहरातील पेठमाप वाशिष्ठी नदीच्या तीरावर भक्तांचा जनसागर उसळला. लपवलेली ४० शेरणे शोधून काढत देवीने आपला महिमा दाखवला आहे.
देवी करंजेश्वरीचे पेठमाप हे माहेर असून, आपल्या माहेरात होणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी जिव्हाळ्याचा मानला जातो. दरवर्षी पेठमाप येथे वाशिष्ठीच्या तीरावर पिवळ्या हळदीच्या फडक्यात नारळ बांधून त्याच्यावर नाव टाकून ते शेरणे लपवले जाते. त्यानंतर देवी हे शेरणे शोधून काढते. एक लांबलचक काठी त्या काठीला वरती मोरपिसांचा गुच्छ बांधलेला असतो. एक व्यक्ती काठी घेऊन शेरणे शोधण्याचे काम करतो. मागून देवीची आणि सोमेश्वराची पालखी आणि भाविक असतात. मनात नवस बोलून लपवलेली शेरणे शोधून काढली तर भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
यावर्षी १३१ शेरणे लपवली होती. त्यातील ४० शेरणे शोधण्यात आली. पेठमापहून शेरणे शोधण्यासाठी देवी करंजेश्वरी आणि श्रीदेवी सोमेश्वर यांच्या पालख्या ढोलताशांच्या गजरात आल्यानंतर अलोट गर्दी झाली. पाच वाजल्यानंतर शेरणे शोधण्यास सुरुवात झाली. शेरणे कार्यक्रमानंतर देवस्थानच्या दोन्ही पालख्या गोवळकोटच्या दिशेने रवाना झाल्या, त्यानंतर शुक्रवारी (ता. १४) सकाळी सात वाजता गोवळकोट सहाणेजवळचा होम पेटवण्यात आला.
महाबली हनुमान ठरले आकर्षण
यावर्षी देवीचे शेरणे शोधणे कार्यक्रमामध्ये पालखीसोबत महाबली हनुमानाची वेशभूषा अतिशय आकर्षक ठरली. ती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बाहुबली हनुमंतरायासाठी खास एक उंच रंगमंच बनवला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 15/Mar/2025














