रत्नागिरी : फेरफार नोंदीसाठी ‘ई-हक्क’द्वारे अर्ज सक्तीचे

रत्नागिरी : ई-हक्क प्रणालीवरील वारस नोंद, मृतांचे नाव कमी करणे, बोजा नोंद करणे अथवा गहाणखत करण्यासारख्या अकरा प्रकारच्या सुविधांसाठी आता केवळ ऑनलाइन कार्यवाही होणार आहे. त्यामुळे अर्ज कोणत्या अधिकाऱ्यासमोर प्रलंबित आहे, याची माहिती सहज कळणे शक्य होणार आहे. ई-हक्काची १०० टक्के अमंलबजावणी होण्यासाठी ऑनलाइनद्वारे अर्ज घेण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे.

अनेकदा नागरिकांकडून ऑफलाइन अर्ज दाखल केले जातात. असे अर्ज ऑनलाईन स्वरूपात दाखल करून घ्या आणि पुढील कार्यवाही करा, अशा सूचना कनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांना ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफार नोंदीचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; मात्र ग्रामीण भागात अनेकांना ऑनलाइनद्वारे अर्ज करणे शक्य होत नाही किंवा त्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे ते लिखित स्वरूपात अर्ज तलाठ्यांकडे देतात; मात्र अनेक दिवस त्यावर कार्यवाही न झाल्याने नागरिकांना ती सुविधा उपलब्ध होत नाही. तसेच त्या अर्जाबाबत विलंब झाल्यास ऑनलाइन नोंद नसल्याने वरिष्ठांना संबंधितावर कारवाई करता येत नाही. ई-हक्क प्रणालीद्वारे फेरफाराची शंभर टक्के अर्मलबजावणी अद्याप झालेली नाही. वारस नोंद, मृताचे नाव कमी करणे, बोजा नोंद करणे आदी सुविधांची आता ऑनलाईन कार्यवाही होणार असल्याने ग्रामस्थाना दिलासा मिळणार आहे.

ई-हक्क प्रणालीद्वारे या सुविधा
ई-करार नोद, बोजा चढविणे, गहाणखत, बोजा कमी करणे, वारस नोंद, मृतांचे नाव कमी करणे, अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, विश्वस्तांची नावे बदलणे, खातेदाराची माहिती भरणे, हस्तलिखित व संगणकीकृत तफावत संबंधीचे अर्ज, मृत कुळाची वारस नोंद १०० टक्के अमंलबजावणी होण्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज घेण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. तालुकापातळीवरील तलाठ्यांपासून प्रांतधिकाऱ्यांना ई-हक्क प्रणालीच्या अंमलबजावणीचे आदेश दिले गेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 15/Mar/2025