रत्नागिरी : वाशिष्ठी डेअरीचे प्रशांत यादव यांनी करबुडे दूध केंद्राची समस्या सोडवली

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील बंद झालेल्या दूध डेअरी केंद्राचा प्रश्न वाशिष्ठी दूध डेअरीचे सर्वेसर्वा प्रशांत यादव यांनी सोडवला असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मुर्तूझा आणि राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी पुढाकार घेतला. यामुळे परिसरातील दूध उत्पादकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

तालुक्यातील करबुडे येथे शेतकऱ्यांच्या सवलतीसाठी वाशिष्ठी दूध डेअरी केंद्राची स्थापना झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले दूध योग्य किंमतीत देता येत होते; मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे दूध डेअरी केंद्र बंद झाले आणि शेतकऱ्यांना खंडाळ्यापर्यंत जावे लागत होते. शिवाय एकाच शेतकऱ्याच्या नांवे दररोजचे बिल अदा केले जात होते. त्यामुळे मजगांवपासूनच्या शेतकऱ्यांना ते परवडत नव्हते.

अखेर मजगांव येथील शेतकरी मकबूल मुकादम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मुर्तूझा आणि राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांच्याकडे ही समस्या मांडली. या समस्येचे गांभीर्य समजून घेत बशीर मुर्तूझा आणि नौसीन काझी यांनी वाशिष्ठी डेअरीचे सर्वेसर्वा प्रशांत यादव यांची भेट घडवून आणली आणि याबाबत चर्चा केली. श्री. यादव यांनी तत्काळ या समस्येचे निराकरण करत शेतकऱ्यांना उद्यापासून करबुडे येथील दूध डेअरी केंद्र सुरू राहील, अशी ग्वाही दिली.

सर्व शेतकऱ्यांनी प्रशांत यादव, बशीर मुर्तूझा आणि नौसीन काझी यांचे मन:पूर्वक आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 05/Oct/2024