Breaking : लाडक्या बहिणींना पुन्हा 3000 रुपये मिळण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

महिलांना 3000 रुपये मिळण्यास सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. महिलांची चिंता करू नये. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत.

महिलांना एकूण मिळाले 7500 रुपये

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.

केवायसी करण्याचे आवाहन

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 05-10-2024