चिपळूण : आपली सध्याची शिक्षण व्यवस्था पाहता त्यात वर्षानुवर्षे असलेली लसावी, मसावी आजही आहे. मात्र, तिचा जीवनात किती फायदा होतो. याचा विचार कोणीही करत नाही. त्यामुळे वेळोवेळी यावर विचार करण्याची गरज आहे. अन्यथा लसावी, मसावी आणि आयुष्यभर भांडीच घासावी, अशी परिस्थिती येणार आहे. भावी पिढी उत्तम घडवायची असेल तर शिक्षकांनी काटकोनाबरोबरच दृष्टीकोन शिकवावा, असे मत कीर्तनकार राधेश्याम करजतकर यांनी व्यक्त केले. तसेच उपस्थितांना स्वच्छता व वृक्ष लागवडीचा संदेश दिला.
नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचे बुधवारी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात बक्षीस वितरण पार पडले. यावेळी ते कीर्तनात बोलत होते.
करजतकर पुढे म्हणाले की, जसजशी परिस्थिती बदलत जाईल, तसे काही महत्वाचे बदल करण्याची गरज आहे. पूर्वी आपण शाळेत लांबलचक लसावी, मसावी, प्रमय सोडवली. मात्र, त्याचा सध्याच्या जीवनात काही फायदा होतो आहे काय, होत असल्यास तो किती जणांना होतो. हा विचार ज्यांनी करायचा आहे ते करत नसतील तर त्यांचा हेतू समजून घेऊन शिक्षकांनीच काही बदल करताना विद्यार्थ्यांना काटकोन, चौकोनाबरोबरच दृष्टीकोनही शिकवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वच्छता राखण्यासह वृक्ष लागवडीचा संदेश देताना आपल्या परिसराची साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांना कायम सन्मानाची वागणूक द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, माजी नगरसेवक, चिपळूण बँकेचे चेअरमन मोहन मिरगल माजी नगरसेवक शशिकांत मोदी, इनायत मुकादम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, रांगोळीकार, चित्रकार संतोष केतकर, किर्तनकार राधेश्याम करजतकर, राजे प्रतिष्ठानचे विशाल राऊत, अॅक्टिव्ह ग्रुपचे अध्यक्ष कैसर देसाई, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 05/Oct/2024