दापोलीत घरफोडी; ५१,५०० रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास

दापोली : दापोली तालुक्यातील करंजाळी येथे एका घरात अज्ञात चोरट्याने घुसून तब्बल ५१,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली असून, याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी निवेदिता सुधाकर चव्हाण (वय ३५, गृहिणी, रा. करंजाळी, पोस्ट फणस, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली आहे. निवेदिता यांनी सांगितले की, अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या किचनच्या भिंतीवरून बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरातील पर्समधून कपाटाची चावी काढून बेडरूममधील पत्र्याच्या लोखंडी गोदरेज कपाटाचे लॉकर उघडले. या लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून आरोपीने पलायन केले. ही चोरी लबाडीच्या उद्देशाने आणि फिर्यादी यांच्या संमतीशिवाय केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात २० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक ५२/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०६ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी अज्ञात असून, त्याचे नाव आणि गाव माहिती नाही.

दापोली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, परिसरातील संशयित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. चोरीच्या या घटनेने करंजाळी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

या प्रकरणात आणखी काही माहिती मिळाल्यास पोलिस तपासातून ते समोर येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, फिर्यादी निवेदिता चव्हाण यांनी पोलिसांना तातडीने आरोपीचा शोध घेऊन चोरीस गेलेला माल परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

चोरीस गेलेला माल
या चोरीत एकूण ५१,५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, त्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले – १७,००० रुपये
५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन – ८,५०० रुपये
५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी – ८,५०० रुपये
८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानपट्या – १३,६०० रुपये
१ ग्रॅम वजनाची सोन्याची मोत्याची नथ – १,७०० रुपये
२०० रुपये किंमतीची सोन्याची चमकी
२,००० रुपये रोख रक्कम

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 21/Mar/2025