संगमेश्वर : रिक्षा व्यावसायिकांची महावितरणवर धडक

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील सीएनजी पंपामध्ये गेले वर्षभर कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे गॅस वितरण सुरळीत होत नाही. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान होत होते. या अडचणीमुळे ते त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी, रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखलीचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या संगमेश्वर कार्यालयावर धडक दिली.

यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता फारूक गवंडी यांनी चर्चेअंती ८ दिवसात योग्य त्या उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन व्यावसायिकांना दिले.

धामणी सीएनजी पंपावर गेले वर्षभर सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत कमी व्होल्टेजमुळे सीएनजी कॉम्प्रेसर लोड घेत नसल्याने सीएनजी पुरवठा बंद राहत होता. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. सुट्टीच्या हंगामातच हातावर पोट असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत असल्याने व्यवसायिकाचे नुकसान होत होते. धामणी सीएनजी पंपाच्या व्यवस्थापनाकडून गेले वर्षभर याबाबत महावितरण कंपनीच्या संगमेश्वर कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. आज अखेर या त्रासाला कंटाळलेल्या कडवई, तुरळ, चिखली, माखजन, आरवली, कुंभारखाणी येथील रिक्षा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिलिंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या संगमेश्वर कार्यालयावर धडक दिली.

यावेळी प्रभारी उप कार्यकारी अभियंता फारूख गवंडी यांच्याशी चर्चा करण्यात आली. गवंडी यांनी महावितरणच्या समस्या मांडल्या. तसेच यासाठी महानगर गॅस कंपनीच्या कॉम्प्रेसरचे सेटिंग कमी करून त्यांनी ही आपल्याला सहकार्य करावे अशी सूचना केली. महावितरण कंपनीच्या ज्या त्रुटी असतील त्या दुरूस्त करुन येत्या आठ दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन गवंडी यांनी दिल्याने रिक्षा व्यावसायिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

यावेळी उपकार्यकारी अभियंता याना निवेदन देण्यात आले यावेळी रिक्षा व्यावसायिक संघटनेचे प्रतीक सुर्वे, राजेंद्र यादव, सचिन हेमन, प्रकाश खाडे, सुनील गागरकर, दिनेश गुरव, सुनील गुरव आदी पदाधिकारी तसेच बहुसंख्य रिक्षा चालक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 21/Mar/2025