चिपळूण : चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या बांधकामासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई येथे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या बसस्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेले काही महिने स्थानकाचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत आमदार निकम यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे रखडलेल्या बसस्थानकासंदर्भात वाढीव निधीची तरतूद करावी व यासाठी बैठकीचे आयोजन करावे, तसे पत्रे दिले होते. या मागणीनुसार गुरूवारी मुंबई येथे परिवहनमंत्री सरनाईक यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत बसस्थानकाच्या कामाबाबत चर्चा झाली. यानंतर सरनाईक यांनी बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
या बैठकीत महामार्गाच्या चौपदरीकरणात सावर्डे बसस्थानक तोडण्यात आले आहे. या बसस्थानकाची पुनर्बाधणी व्हावी, हा मुद्दा उपस्थित केला. त्यालाही मंत्री सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवत आराखडा बनवण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, कोकण विभागीय बांधकाम कार्यकारी अभियंता सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 21/Mar/2025














