संगमेश्वर : कडवई येथे जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर कडवई येथे जोडरस्त्याचे काम रखडल्यामुळे वाहनचालकासह ग्रामस्थांची गैरसोय होत होती. याबाबत सातत्याने तक्रार केल्यानंतर आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे जोडरस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरू असून, तुरळफाटा येथे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. महामार्ग व कडवईला जोडणारा रस्ता यामध्ये मोठा खड्डा तयार झाला होता. तेथे दगड व माती टाकून भराव करण्यात आला; परंतु हे काम काळजीपूर्वक न केल्यामुळे वाहनचालकांना गावातून महामार्गावर येताना त्रास सहन करावा लागत होता. काही वेळा तिथे अपघातही होत होते. भरावानंतर त्यावर रोज पाणी न मारल्यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होत होता.

या त्रासाला कंटाळून तुरळफाटा व्यापारी संघटनेने या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नागरिकांची व व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित या कामात लक्ष टाकले. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने लगेचच कामाला सुरुवात केली. या कामाचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे.

आमदारांनी या कामात लक्ष दिल्यामुळेच हे काम जलदगतीने सुरू झाले आहे. याबद्दल व्यापारी व वाहनचालकात समाधानाचे वातावरण आहे. काँक्रिटीकरण झाल्याने कडवईची वाहतूक चिखली व धामणाकवाडीमार्गे सुरू आहे. तरीही वाहनचालकांनी आठ दिवस सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपंचायत कडवईच्यावतीने करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 26/Mar/2025