गुहागर : चिखली गावातील देवराईमध्ये पसरला ‘सुरंगी’चा दरवळ

गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावर शृंगारतळीवरून २ कि.मी. अंतरावर असलेल्या चिखली गावातील देवराईमध्ये ‘सुरंगी’चा दरवळ सध्या पसरला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना याचा अनुभव येत आहे.

तालुक्यातील चिखली गावातील कारूळ फाट्याजवळ चिखलीची देवराई आहे. मध्यंतरी वनविभागाने ‘स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान’ असे नामकरण करून ही देवराई विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. या जैवविविधता उद्यानात अर्थात देवराईत विविध बांधकाम, विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, झाडांना कठडे, अंतर्गत पाखाड्याही उभारण्यात आल्या आहेत. या देवराईत पुरातन गावदेवी झोलाई- वाघजाईचे मंदिर आहे. देवराई परिसरात अनेक जैवविविधता असलेल्या वनस्पती आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खानू व चिखली येथे हे दोन जैवविविधता उद्यान वन विभागाने विकसित केले होते. पण, आता या जैवविविधतेने नटलेल्या उद्यानांकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. या देवराईत असलेली सुरंगी बहरली असून त्याचा सुगंध दरवळत आहे.

सुरंगी हे तळकोकणात आढळणारे सदाहरित, मध्यम आकाराचे झाड आहे. झाडाला जखम झाल्यावर खोडातून पिवळसर डिंक येतो. याची पाने लांबट, रबरी असतात. मार्च-एप्रिल दरम्यान याला फुले येतात. सुरंगीची फुले फुलोऱ्यात न येता, जुन्या फांद्यांवरच येतात. फुलांना चार पांढऱ्या पाकळ्या, दोन संदल, खूप पुंकेसर व लांब देठ असतो. याची नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात.

मालवणीत नर झाडाला सुरंगी व मादी झाडाला बुरंगा म्हणतात. दोन्ही झाडे दिसायला सारखीच असतात. यांत फरक असा की, नर फुलांमध्ये फक्त पुंकेसर असतात. पुंकेसर पिवळ्या रंगाचे व सुगंधी असतात. तर मादी फुलांच्या मध्यभागी फुलदाणीच्या आकाराचा, लाल रंगाचा एकच स्रीकेसर व त्याभोगती पुंकेसर असतात. गजरा व अत्तरासाठी फक्त नर फुलांचाच वापर केला जातो. नर फुलांपासून फळ तयार होत नाही. तर मादी फुलांपासून अंडाकृती, दगडी फळ तयार होते.

सुरंगीचे शास्त्रीय नाव मॅमोया सुरीगा असे आहे. मॅमेय या वेस्ट इंडीज स्थानिक नावावरून चराशर व सुरीगे या कन्नड नावावरुन सुरिगा या शब्दांची उत्पत्ती झाली. सुरंगीचा समावेश ‘कॅलोफायलेंसी’ (उंडी कुळ) मध्ये होतो. पुर्वी ठंडी कुळ हे ‘क्लुसियासी’ (कोकम कुळ) मध्येच समाविष्ट होते. सुरंगी व उंडी/उंडग या दोन्ही झाडांमध्ये खुप साम्यता दिसुन येते. उंडीची फुले सुरंगीच्या मादी फुलांसारखीच दिसतात. यात फरक म्हणजे उंडीची फुले ही फुलोऱ्यात असतात, तर सुरंगीची फुले फांद्यांवरच लांब देठाने जोडलेली असतात. उंडीची फळे ही गोलाकार तर सुरंगीची फळे अंडाकृती असतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:01 PM 26/Mar/2025