रत्नागिरी : जूनअखेर पाणी पुरण्यासाठी पालिकेचे ‘पाणीसूत्र’

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यातील पुढील तीन महिन्यांचे पाणी नियोजन केले आहे. शीळ धरणात असलेला कालपर्यंतचा पाणीसाठा 1.863 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी पुढील तीन महिने कसे पुरवता येईल, यासाठी सुत्र तयार केले आहे. दर महिन्याला 0.500 दशलक्ष घनमीटरएवढे शहराला पाणी लागते. सलगत तीन महिने पुरवल्यास 1.500 दशलक्ष घनमीटरएवढे पाणी लागणार आहे. त्यानुसार पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी विभागाने पाण्याचे नियोजन केले आहे. यंदा शहरवासीयांना पाणीटंचाईची चिंता नाही. जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे पाणीसुत्र सांगत आहे.

पानवल धरण आणि नाचणेतील काही तलावांचा हातभार लागतो; परंतु पानवल धरण दुरुस्तीसाठी काढल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही; परंतु पावसापूर्वी पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम झाले, तर भविष्यात पानवल धरणाचा पाणीपुरवठ्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी संपूर्ण भिस्त ही शीळ धरणावरच आहे. शहराचा विचार केला तर शहरातील सुमारे 10 ते 11 हजार नळधारकांसाठी सुमारे 18 ते 20 एमएलडी पाणी दररोज लागते. पाणीगळतीचे प्रमाणही 25 ते 30 टक्के होते. शीळ जॅकवेलमधील तीन विद्युतपंप 24 तास चालतात. त्यामुळे पालिकेला येणारे वीजबिल देखील महिन्याला 18 ते 20 लाख मोजावे लागत होते; परंतु आता सुधारित पाणीयोजनेमध्ये नवीन जलवाहिनी टाकल्यामुळे आणि नवीन विद्युतपंप टाकल्याने बरीच सुधारणा झाली आहे. पाणीगळती कमी झाली आहे.

पालिका आता उन्हाळ्यातील पाणी नियोजनामध्ये गुंतली आहे. शहरवासीयांना पाणीटंचाई न भासता उन्हाळ्यात पुरेसे पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणीकपात केली जाणार आहे. शीळ धरणामध्ये गेल्यावर्षी 25 मार्च 2024 ला 1.524 दलघमीएवढा पाणीसाठा होता; परंतु 25 मार्च 2025 ला 1.863 दलघमीएवढा पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा असल्याने पाणी नियोजन करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्याचे पाणीसुत्र पालिकेने तयार केले आहे. दर महिन्याला 0.500 दशलक्ष घनमीटर एवढे शहराला पाणी लागते. सलग तीन महिने पुरवल्यास 1.500 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी लागणार आहे. धरणामध्ये तेवढा साठा असल्याने शहवासीयांना यंदा पाणीटंचाईची चिंता नाही, असे सध्याचे सुत्र सांगत आहे. पालिका प्रशासनाने ही अधिकृत माहिती दिली.

…अशी होणार टप्प्याटप्प्याने पाणी कपात
मार्च महिन्याच्या अखेरपासूनच शहरातील पाणीकपातीला सुरवात होणार होती; परंतु गुढीपाडवा, ईद सण आल्यामुळे तूर्तास ही कपात मागे घेऊन एप्रिल महिन्यापासून दर सोमवारी पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवाठा होईल. आवश्यकता भासल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल, असे नियोजन आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:52 PM 27/Mar/2025