रत्नागिरी : येथे प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याला ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिरापर्यंत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. त्याच्या प्रचारासाठी २९ मार्च रोजी सायंकाळी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. स्वागतयात्रेच्या पोस्टरचेही अनावरण पतितपावन मंदिरात झालेल्या आढावा बैठकीत करण्यात आले.
प्रतिवर्षीप्रमाणे हिंदू नववर्ष दिनाच्या दिवशी स्वागतयात्रेचे नियोजन हिंदू बांधवांकडून करण्यात येत आहे. या स्वागतयात्रेत सर्व हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे यासाठी २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दुचाकी फेरीचे नियोजन करण्यात आले. ही फेरी श्री पतितपावन मंदिर येथून सुरू होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मारूती मंदिर, साळवी स्टॉप आणि परत नाचणेमार्गे जयस्तंभ, घुडेवठार, मांडवी अशा जवळपास संपूर्ण रत्नागिरी शहराची परिक्रमा करून नववर्ष स्वागत यात्रेचा प्रचार करणार आहे.
या यात्रेमध्ये हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, तसे आवाहन करण्यासाठी आयोजित मोटरसायकल रॅलीमध्ये स्वतःची मोटरसायकल घेऊन रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. आढावा बैठकीला सुधाकर सावंत, आनंद मराठे, गजानन करमरकर, उमेश खंडकर, अमृतभाई पटेल, वैशाली खाडिलकर, राजेश आयरे, संजय जोशी, दीपक सुर्वे, मंदार खेडेकर, राजू जोशी आदींसह अनेकजण उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 28-03-2025
