रत्नागिरी : आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. जिल्हा परिषदेमध्ये विविध योजनेमधून तसेच जिल्हा नियोजनांतून विकास कामांसाठी ठेवलेल्या निधीचे योग्यपद्धतीने वितरित होणे गरजेचे असते. अन्यथा, तो परत जाण्याची शक्यता असते. कोणताही निधी परत जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन तयारी करत असते. सध्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मार्च अखेरची धावपळ सुरू आहे.
शिमगोत्सवासाठी शासकीय कार्यालयांना १४ ते १६ मार्च अशी सलग तीन दिवसांची सुटी मिळाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उत्सव उत्साहात साजरा केला. गेल्या आठवड्यापासून सर्व शासकीय कार्यालये पुन्हा गजबजली.
मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मार्चअखेरपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची धावपळ सुरू होते. विविध प्रकारची बिले, पगारपत्रके कोषागार कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्याची लगबग सुरू होते.
ज्या कामांसाठी आलेला निधी ३१ मार्चपूर्वी १०० टक्के खर्च होण्यासाठी सर्व यंत्रणा आपले प्रयत्न पणाला लावत असतात. काही यंत्रणा सुरुवातीला सुस्त राहतात आणि मार्च महिना सुरू झाल्यानंतर कामाला लागतात. काही वेळा शासनाकडूनच निधी अगदी शेवटच्या दिवशी येतो आणि मग तो खर्ची टाकताना यंत्रणांचा जीव मेटाकुटीस येतो. मागील आठवड्यात सणांमुळे सलग तीन दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी मिळाली. त्यामुळे मार्च एडिंगचा ताण बाजूला सारून शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी होळीचा सण आनंदात साजरा केला. तीन दिवस या कार्यालयांच्या परिसरात शुकशुकाट होता.
परंतु सोमवारपासून पुन्हा सर्व कार्यालये गजबजू लागली. आता ३१ मार्चपर्यंत कार्यालयांची खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी धावपळ होणार आहे. यावर्षी बहुतांश यंत्रणांचा निधी आधीच आलेला आहे. यंदा शासनाने १५ मार्चनंतर कुठल्याही कामांना मंजुरी मिळणार नाही, असा निर्णय घेतल्याने आलेला निधी शेवटच्या दिवशी खर्च केलेला दाखविता येणार नाही. त्यामुळे यावर्षी यंत्रांचा निधी परत गेला तर त्याचे खापर त्या विभागप्रमुखाच्या डोक्यावर फुटणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 28/Mar/2025
