चिपळूण : राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने नमन लोककला महोत्सव रत्नागिरीनंतर यावर्षी चिपळुणात होत आहे. नमनला राजमान्यता मिळाली आहे तशीच शक्तीतुरा म्हणजे जाखडीलाही मिळायला हवी. सांस्कृतिक विभागाने या लोककलेलाही न्याय द्यावा. शक्तीतुऱ्यामध्ये वाद असतात तसे या लोककलेतील मंडळांनी, कलाकारांनी वाद घालू नये. शासनाकडून जे मिळेल ते घ्या. राजश्रय घ्या मग त्यात सुधारणा करता येतील, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित तीन दिवसांच्या नमन महोत्सवाचे उद्घाटन डॉ. विनय नातू व मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकार, नमन लोककला संस्था जिल्हा उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते, सुधाकर माचकर आदी उपस्थित होते. या वेळी लिगाडे यांनी या नमन महोत्सवाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांची उपस्थिती नसल्याने त्याकडे लक्ष वेधले. राजमान्यता मिळाली आहे.
परंतु लोकमान्यताही या लोककलेला मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मतदान जनजागृतीसाठी आम्ही या लोककलेचा उपयोग केला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
या प्रसंगी आर्ते म्हणाले, मजुरी आणि शेती करून अनेक कलाकार नमन जाखडीची कला पुढे चालवत आहेत. या कलाकारांना समाजानेच प्रोत्साहन द्यायला हवे. आपल्या भागातील कला आपण जोसापून तो वाढवली पाहिजे. पुढील महिन्यात परदेशातही नमनाचा कार्यक्रम होणार असल्याचे आतें यांनी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
…. असा सुटला नमन मंडळांचा प्रश्न !
नमन लोककला संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष आर्ते यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाला जाताना कलाकारांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या, नमन मंडळातील कलाकारांची संख्या जास्त असते. त्यामुळे या कलाकारांना मोठ्या वाहनांतून प्रयोग असलेल्या गावात प्रवास करावा लागतो; मात्र त्या मार्गावरील तपासणी नाक्यात पोलिसांकडून होणारी प्रश्नांची सरबत्ती, भुर्दड याबाबत आर्ते यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर गेल्या दोन वर्षात कुठल्याही चेकपोस्टवर एकही रुपया नमन मंडळांना द्यावा लागला नाही, याबद्दल त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 28/Mar/2025
