रत्नागिरी : आठवडा बाजार ते काँग्रेस भुवन नाक्यापर्यंत आज वाहतुकीस प्रतिबंध

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मेळावा कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे दि. ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना ७ ऑक्टोबर रोजी शहरातील आठवडा बाजार नाका ते काँग्रेस भुवन नाका दरम्यान वाहतुकीस प्रतिबंध करण्याबाबतचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मेळाव्याचे कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे आयोजित करण्यात आले आहे.

या मेळाव्याकरिता जिल्ह्यातील अंदाजे ५ हजार महिला उपस्थित राहणार असल्याचे कळविण्यात आले

आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ व ११६ नुसार प्राप्त अधिकारान्वये वाहतूक कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आठवडा बाजार नाका ते काँग्रेस भुवन नाका दरम्याने सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच पर्यायी मार्ग म्हणून काँग्रेस भुवन-मुरलीधर मंदिर-भुते नाका मार्गे आठवडा बाजार या पर्यायी मागनि वाहतूक वळविण्यात यावी. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलिस विभागाने करावयाची आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 07-10-2024