लांजा तालुक्यात ऐतिहासिक खजिना; पर्यटनाला मिळणार चालना

लांजा : लांजा तालुका नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण आहे. या ठिकाणी ऐतिहासिक पाऊलखुणा आढळतात. प्रभानवल्ली, साटवली, जावडे, माचाळ, सापुचेतळे, कोट, हर्दखळे, शिपोशी या गावांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या गावांमध्ये आजही ऐतिहासिक वास्तूचे अवशेष आढळून येत आहेत. मात्र, त्यांचे योग्य तन्हेने जतन आणि संशोधन झाले नसल्याने लांजा तालुक्याचा हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे. यासाठी आ. किरण सामंत यांनी लक्ष घातल्याने लांजा वासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लांजा तालुका पर्यटनपूरक पैलूंनी व्यापलेला आहे. मात्र, त्या पर्यटन विकास होण्याच्या त्या दृष्टीने प्रशासन, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी आता पाऊले उचलायला हवी. तालुक्यात ऐतिहासिक ठिकाणांची अभ्यासपूर्व माहिती पर्यटनवाढीसाठी पुढे गरजेचे आहे.

प्रभानवल्लीची शिवकालीन गुहा
प्रभानवल्लीच्या पूर्व दिशेला ३ ते ४ कि. मी. अंतरावर विशाळगड आहे. तालुक्यातील प्रभावल्ली गाव छ. शिवाजी महाराजांच्या कार्यकुशलतेची साक्ष देत होता. या गावात फेरफटका मारल्यास शिवकालीन पाऊलखुणा आढळतात. गावामध्ये शिवकालीन तीन मोठ्या गुहा आहेत. गुहेच्या शिलालेखावर अरबी भाषेत काही मजकूर कोरलेला आहे. त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. गुहांच्या शेजारी मुचकुंदी नदी आहे. या गुहा काळ्या ताशीव दगडाने एकसारख्या रचनेने कोरलेल्या आहेत. या गुहांचे प्रवेशद्वार तीन ते चार फूट रुंद असून आतील व्यास मोठा आहे. प्रथमदर्शनी आतमध्ये वीस ते पंचवीस व्यक्ती सहज मावू शकतील एवढी मोठी गुहा आहे. आतील भागही बंदावस्थेत असे दिसतात. या गुहांबाबत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. गुहांमधून विशाळगड किल्याच्या व सह्याद्रीच्या पर्वतरांगा ठळकपणे नजरेस पडतात.

साटवलीची शिवकालीन गढी (कोठार)
शिवाजी महाराजांनी पूर्णगडाच्या बांधणीनंतर साटवली या ठिकाणी गढीची (कोठार) बांधणी केली. सर्वसाधारण साधन सामग्री तसेच सैन्याला लागणाऱ्या लढाऊ तसेच जीवनावश्यक वस्तू साठवून ठेवण्यासाठी बांधलेली जागा. ज्यामुळेच या गावाचे साटवली हे नाव प्रचलित झाले असावे असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. लांजा शहरापासून १८ किमी अंतरावर ही शिवकालीन गडी इतिहासाची साक्ष देत आहे. पूर्वी मुचकुंदी नदीमार्फत त्यापुढे खाडी मार्ग ते पुढे समुद्र असल्याने साटवलीला व्यापारी बंदर अशी ओळख आहे. येथील गढीला साटवली किल्ला असेही संबोधले जाते. गडीचा परिसर ५ एकरचा असून पूर्व-पश्चिम लांबी ४५ मीटर तर उत्तर-दक्षिण ३० मीटर आहे.

जावडेची कातळ शिल्पे : येथे जांभ्या दगडात कोरलेली कातळशिल्पे ही तालुक्याची पश्चिम दिशेला जावडे गावात आहेत. गावातील जांभ्या दगडात विस्तारलेल्या पठारावर नदीकिनारी असलेल्या या शिल्पाना शैव लेणी असेही संबोधले जाते. प्रथम दर्शनी या लेण्या दृष्टीस पडत नाहीत. या लेण्यांबाबत स्थानिक नागरिक येथील रूढी-परंपरा बाबत अनेक कथा सांगतात. लेण्यांच्या वरील बाजूला माळरानावर कातळशिल्पे आढळतात. लेण्यांना स्पर्श करून वाहणारी व बारमाही पाणी असणारी लहान नदी लक्ष वेधून घेते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 29/Mar/2025