Raj Thackeray Speech On Chhaava Movie: सध्या औरंगजेबाची (Aurangzeb) कबर हटवावी की हटवू नये यावरून जोरदार राजकीय गदारोळ सुरू आहे. मात्र शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमाची साक्षीदार म्हणून औरंगजेबची कबर असली पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केली.
उलट शिवरायांचा पराक्रम शिकवण्यासाठी शाळेच्या सहली औरंगजेबच्या कबरीजवळ नेल्या पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला. चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत असा टोला देखील राज ठाकरेंनी लगावला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं, विक्की कौशल मेल्यावर? : राज ठाकरे
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, “चित्रपट पाहिल्यावर जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत, चित्रपट थिएटरमधून उतरला की, हे सुद्धा उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विक्की कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअॅपवर इतिहास नाही वाचता येत, इतिहास वाचायचा असेल तर पुस्तकार डोकं घालावं लागेल तुम्हाला, कुणीही बडबडायला लागलंय आता इतिहासावर, विधानसभेतही बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही, औरंगजेबावर बोलतायत, माहितीय तरी का? औरंगजेब काय प्रकरण होतं?”
औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला : राज ठाकरे
“आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात… माहिती तरी आहे का, हे औरंगजेब प्रकरण? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग सोपं आहे, इतिहासावरुन जाती-पातींमध्ये भडकवून द्यायला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं, त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की, आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत? आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे.”, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता? : राज ठाकरे
“छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते, मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना?”, असं राज ठाकरे म्हणाले.
औरंगजेबाची कबर सजवली आहे, ती सजावट काढा : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले की, “औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगालपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. 1681 ते 1707 औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी-धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही. औरंगजेबाची कबर सजवली आहे, ती सजावट काढा आणि तिथे लिहा की, आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 31-03-2025
