रत्नागिरी : नवी मुंबई येथील बाजार समितीत हापूस आंब्यांच्या पेठ्यांची बंपर आवक झाली आहे. सोमवारी (ता. ७) १ लाख हापूस आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या असून, त्यामध्ये ८० हजार पेट्या हापूस आंब्याच्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत तर उर्वरित २० हजार पेठ्या परराज्यातील आंब्यांच्या आहेत. मंगळवारी (ता. ८) ६२ हजार ८०० पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे हापूसचे दर साडेतीन ते ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केले जात असले तरी दर कमी झाल्याने बागायतदार नाराज झाले आहेत.
हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अपेक्षित मोहोर आला नाही. त्यामुळे यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात हापूसचे उत्पादन कमीच राहिले. परिणामी, बाजारातील हापूसचा दर पाच डझनच्या पेटीला ६ से ८ हजार रुपये होता. गुढीपाडव्यालाही बाजारातील आवक कमीच होती. त्या वेळीही दर पेटीला ६ हजार रुपयांपर्यंतच राहिला, दर चढे असल्याने सर्वसामान्यांना हापूसची चव चाखता येत नव्हती. मागील पंधरा दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर उष्माही अधिक वाढला, परिणामी, हापूस वेगाने तयार होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारातील पेठ्यांची संख्याही वाढलेली आहे.
हंगाम सुरू झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत प्रथमच ८० हजार पेटी हापूस कोकणातून वाशी बाजारात दाखल झाला आहे. त्यामध्ये रायगडमधून अत्यल्प असून, सर्वाधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधीलच आहेत. दर्जेदार फळाच्या पेटीला सर्वाधिक ४ हजार रुपये दर मिळत आहे तर डागी आंब्याला पेटीचा दर १ हजार रुपये आहे. एप्रिल महिन्यात हापूस अधिक चवदार होतो आणि गोहीही वाढत असल्याने ग्राहकांकडून मागणी सुरू होते.
दरम्यान, यंदा वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. या बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर होत आहे. यावर्षी राजापूर तालुक्यातून सर्वाधिक आंबा बाजारात दाखल होत असल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले.
थेट विक्रीतून चांगला दर
उन्हामुळे आंबा भाजायला लागला आहे. त्यामध्ये पावसाचीही भीती बागायतदारांपुढे आहे. त्यामुळे आंब्याची तोड वेगाने केली जात आहे. त्यामुळे बाजारात हापूसची आवक वाढत आहे परंतु नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आणि दर्जेदार हापूसला थेट ग्राहकांकडून डझनला एक हजार रुपये आणि पाच डझनच्या पेटीला ५ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. सध्या बेंगलोर, गोवा, हैदराबाद, नागपूर येथे हापूसच्या पेट्या पाठवत असल्याचे बागायतदार जयवंत बिर्जे यांनी सांगितले,
रोज १२ हजार बॉक्स परदेशात
हापूसची आवक वाढत असली तरीही आखाती देश युरोप, अमेरिका देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. रोज १२ हजार बॉक्स पाठवले जातात. त्याला दरही चांगला मिळत आहे. निर्यात व्यवस्थित सुरू आहे.
यंदा हापूसचे उत्पादन कमी आहे. मात्र, एप्रिल ते मे महिन्याचा पहिला आठवडा या कालावधीत मुबलक पीक हाती येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कालपासून मोठ्या प्रमाणात पेट्या येण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढती का आपसूकच दर कमी होतात. ग्राहकांकडून खरेदी वाढणेही तेवढेच गरजेचे आहे. – संजय पानसरे, संचालक, बाजार समिती, वाशी
रत्नागिरीतील किनारी भागातील बागांमधून मोठ्या प्रमाणात आंबा काढणी सुरू आहे. २० मेपर्यंत हा हंगाम सुरू राहील. आवक वाढल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार रुपयांनी हापूसचे दर कमी झाले आहेत. गेल्या वर्षी रामनवमीला ४५०० रुपये पाच डझनच्या पेटीचा दर होता. यंदा तो ३५०० रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि नफा याचे गणित बिघडणार आहे. यामध्ये विक्रेत्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे- उमेश रहाटे, आंबा बागायतदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 09/Apr/2025














