चिपळूण : अपरांत हॉस्पिटलमध्ये ‘टेली आयसीयू’ची सेवा

चिपळूण : कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये टेली आयसीयूची सेवा सुरू करण्यात आली आहे. दूरस्थ तज्ज्ञ उपलब्ध असलेला कोकणातील हा पहिला उपक्रम आहे. या दालनाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

अपरांत हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी संचालक डॉ. यतीन जाधव म्हणाले, टेली आयसीयू ही डिजिटलप्रणाली आहे. यामध्ये शहरातील आयसीयू तज्ज्ञ हे दूरस्थ प्रणालीद्वारे ग्रामीण दुर्गम प्रदेशातील रुग्णालयातील आयसीयू रुग्णांच्या तपशीलावर सतत लक्ष ठेवतात आणि स्थानिक डॉक्टरांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग), लाईव्ह पॅरामीटर्स, सतत लक्ष ठेवणे, डिजिटल मेडिकल रेकॉर्डर्सचा वापर केला जातो. अपरांत हॉस्पिटलने भविष्यातील आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान अंगीकारून टेली आयसीयू सेवा कोकणवासीयांसाठी सुरू केली आहे तर सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. अमित माने म्हणाले, टेली आयसीयू ही केवळ सेवा नाही तर एक जबाबदारी आहे.

आमचे तज्ज्ञ चिपळूणमधील रुग्णांच्या उत्तम आरोग्यसेवेसाठी प्रत्यक्ष योगदान देत आहेत. हा उपक्रम एक वैद्यकीय क्रांती आहे आणि त्याचा फायदा निश्चितच सर्व कोकणवासीयांना होईल. या कार्यक्रमाला डॉ. अब्बास जबले, मुख्याधिकारी विशाल भोसले, शौकत मुकादम यांनीदेखील आपले मनोगत मांडले. सूत्रसंचालन डॉ. रेहमत जबले यांनी केले.

टेली-आयसीयूचे फायदे असे

दूरस्थ तज्ज्ञांची उपलब्धता
चोवीस तास गंभीर आजारी रुग्णांवर सतत लक्ष
अनेक आयसीयू विभाग एकाच प्रणालीशी जोडले जाऊ शकतात
माहितीची देवाणघेवाण आणि समन्वय साधणे शक्य

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 09/Apr/2025