खेड : तालुक्यातील हवामानाने पुन्हा एकदा आपली चकवा देणारी भूमिका बजावली आहे. काही भागांत प्रचंड गर्मी आणि उष्म्याने नागरिक हैराण झाले असताना, दुसरीकडे काही गावांमध्ये अचानक झालेल्या गारपिटीमुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
खेड शहर व आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमान चढत्या आले असून, दुपारनंतर उस्मा प्रचंड जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्यांवर वर्दळही कमी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, तालुक्यातील काही भागांमध्ये, विशेषतः डोंगराळ व ग्रामीण पट्ट्यांमध्ये अचानक झालेल्या गारपिटीमुळे आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला आहे. अनेक बागायतदारांनी नुकतेच आंब्याचे फळ धरायला सुरुवात झाली असतानाच आलेल्या गारपिटीने फळांवर डाग पडले असून, उत्पादन व गुणवत्ता दोन्हीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंबा उत्पादक बागायतदार म्हणाले, या वर्षी चांगले उत्पादन अपेक्षित होते. पण अशा प्रकारचा अनपेक्षित गारपाऊस झाल्यास नुकसान मोठे होऊ शकते, शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
तालुका प्रशासनाकडून हवामान विभागाशी संपर्क साधून पुढील काही दिवसांचा अंदाज घेतला जात असून, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकाच तालुक्यात उष्म्याची तीव्रता आणि गारपिटीसारखे दोन्ही टोकाचे हवामान अनुभवास येत असल्याने, सामान्य नागरिक आणि शेतकरी दोघेही गोंधळलेल्या स्थितीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 09-04-2025














