रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरात जुन्या नौकांचे सांगाडे

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर म्हणून मिरकरवाडा बंदराची ओळख आहे. या बंदराच्या विकासासाठी शासनाने दुसऱ्या टप्प्यात निधीही दिला आहे. मात्र बंदरातील स्वच्छतेबाबत अनास्था दिसून येते. येथील चौथ्या जेटीजवळील परिसरात जुन्या मासेमारी नौका अर्धवट बुडालेल्या स्थितीत आहेत. त्यांचे भाग कुजलेले असून ते बाजूला काढले तर त्याच ठिकाणी मासेमारी करून आलेल्या अन्य नौका उभ्या करण्यास जागा उपलब्ध होऊ शकते.

शासनाने शंभर दिवसात वेगवेगळे उपक्रम राबवून गतिमान प्रशासन करण्यावर भर दिलेला जात असतानाच मिरकरवाडा बंदरातील तुटलेल्या नौकांचा सांगाडे काढून स्वच्छता केव्हा केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिरकरवाड़ा बंदराची जबाबदारी प्राधिकरण आणि मत्स्य विभागावर आहे. या बंदराच्या विकासासाठी काही दिवसांपूर्वी या परिसरातील अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. यासाठी मंत्री नितेश राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मिरकरवाडा बंदराच्या विकासाराठी टप्पा २ मधून निधीही दिला आहे.

यामध्ये बंदरातील चार बेटींचे मजबुतीकरण केले जाणार आहे. सध्या पहिल्या तिन जेटीचा उपयोग नौका उभ्या करण्यासाठी होतो. मात्र चौथी बेटी गाळात बुडाली असून तिथे जुन्या मच्छोमारी नौकांचे सांगाडे गेले अनेक दिवस पडलेले आहेत. या बोटी संबंधित नौका मालकांनी काढणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर मत्स्य विभागाकडून त्या नौका काढण्यासाठी कार्यवाही केली जाते. गेले अनेक दिवस त्या नौका तिथेच पडून राहिल्यामुळे लाकडे कुजलेली आहेत. त्यावर अनेकप्रकारचे किटक बसलेले असतात.

या बंदरामध्ये गाळ साचलेला असल्यामुळे ओहोटी लागली की पाणी कमी होते. त्यावेळी चौथ्या जेटीजवळील भागातील तळ दिसू लागतो. त्या परिसरात मासेमारी नौका उभी केली जात नाही. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली, तर भविष्यात अनेक नौका उभ्या करण्यासाठी जागाही उपलब्ध होणार आहे

मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे तेथील विकासाची कामे लवकरच सुरू केली जातील. त्यावेळी बंदरातील तुटलेल्या नौका काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. – सागर कुवेसकर, प्रभारी सहाय्यक मत्स आयुक्त

मिरकरवाडा बंदरातील सफाईचे काम शासनाने वेगाने केले. मात्र कालांतराने त्यांचा वेग पूर्णतः थांबलेला आहे. हे बंदर पाहण्यासाठी परजिल्ह्यातील लोकही येथे येतात. त्यांच्यापुढे अस्ताव्यस्त झालेल्या नौकांचे सांगाडे दिसतात. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. – राजन सुर्वे, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मच्छीमार नौका चालक-मालक असोसिएशन

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 01/Apr/2025