राजापूर : माहिती तंत्रज्ञान किंवा सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे त्याचा बागुलबुवा न करता ते सकारात्मतेने स्वीकारून मुलांना जाणीवपूर्वक पुस्तक वाचनाकडे वळवावे लागेल.
त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी संयम वाढवून मुलांशी असलेला संवाद वाढवायला हवा. त्यातून सृजनशील संस्कारक्षम पिढी घडविणे शक्य होईल, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा व शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने आयोजित ‘महावाचन उत्सव २०२४’ अंतर्गत जिल्हास्तरीय पुस्तक वाचन व लेखन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, संदीप कडव, आर. के. कांबळे, सौ. मांजरेकर उपस्थित होते. यावेळी सौ. रानडे यांच्या हस्ते महावाचन स्पर्धेतील जिल्हास्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व पुस्तक भेट देवून गौरविण्यात आले.
तसेच मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानांतर्गत निपुण भारत शाळा उपक्रमातील विजेत्या शाळा व निपुण माता, पालक गटांना सन्मानित करण्यात आले. महावाचन उपक्रमात परीक्षण करणाऱ्या शिक्षकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 01/Apr/2025














